काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी त्यांचे वडिल आणि देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना दिल्लीतील वीरभूमीत श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वार्डा, खासदार के. सी. वेणुगोपाल आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. राजीव गांधी यांची आज ७८ वी जयंती आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राजीव गांधींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

‘बाबा, तुम्ही माझ्या हृदयात प्रत्येक क्षणी आहात. तुम्ही देशासाठी पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करेल’  असं भावनिक ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. १९८४ ते १९८९ या काळात राजीव गांधींनी देशाचं पंतप्रधानपद भुषवलं होतं. १९९१ मध्ये एलटीटीईच्या(LTTE) दहशतवाद्यांकडून त्यांची हत्या करण्यात आली होती.

”राजीव गांधी हे २१ व्या शतकातील भारताचे शिल्पकार होते. त्यांच्या दुरदृष्टीमुळेच भारतात आयटी आणि दुरसंचार क्षेत्रात क्रांती झाली” असे ट्वीट करत काँग्रेसनं राजीव गांधींना आदरांजली वाहिली. देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे राजीव गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.

राजीव गांधी यांनी देशाला नव्या उंचीवर नेले. मात्र, विकासाच्या या प्रवासात त्यांना आपल्यापासून मध्येच हिसकावून घेण्यात आले, असे ट्वीट काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केले आहे.

राजीव गांधींच्या जयंतीचं औचित्य साधून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत ‘राजीव गांधी सेंटर ऑफ अ‍ॅडव्हॉन्स टेक्नोलॉजी’ (R-CAT) या संस्थेचं आज उद्घाटन करणार आहेत. राजीव गांधींनी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचं महत्व ओळखून तीन दशकांपूर्वीच या क्षेत्राच्या विस्ताराचा पाया रचला, असे ट्वीट गहलोत यांनी केले आहे.