काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डोवाल हे भारतातील दूरध्वनी, व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इतर संवाद माध्यमांवर नियंत्रण ठेवत असून ‘फोन टॅपिंग’द्वारे मिळालेली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचवली जाते, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
तुमच्या फोनमध्ये डोवालजी बसले आहेत
इंदूरमध्ये शनिवारी काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पाचव्या आवृत्तीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी ‘सिस्टम विरुद्ध विद्यार्थी’ या विषयावर भाष्य केले. यावेळी त्यांनी स्वतःचा मोबाइल फोन हातात घेत प्रेक्षकांना दाखवला. “या फोनमध्ये डोवालजी बसले आहेत, तुमच्याही फोनच्या आत डोवालजी बसले आहेत,” असे राहुल गांधी म्हणाले.
भारताला नियंत्रित करण्यासाठी ५०० लोक पुरेसे
राहुल गांधी यांनी असा दावाही केला की, अजित डोवाल अनौपचारिक बैठकांमध्ये “भारताला नियंत्रित करण्यासाठी फक्त ५०० लोकांवर नियंत्रण मिळवणे पुरेसे आहे,” असे म्हणतात.
डोवाल यांच्याकडे देशातील दूरध्वनी, व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरील संवादाचे नियंत्रण असल्याचा तसेच ‘फोन टॅपिंग’ केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या माध्यमातून मिळालेली माहिती पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचवली जाते, असे राहुल गांधी म्हणाले.
सिस्टमला प्रश्न विचारणारे विद्यार्थी नकोत
या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी शिक्षण, सरकारी भरती, रोजगार, परीक्षा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘सिस्टम’ विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू देत नाही, असा आरोप त्यांनी केला.
विद्यार्थी प्रश्न विचारतात, त्यामुळेच ते या व्यवस्थेसाठी धोकादायक ठरतात, असा दावा राहुल गांधी यांनी केला. विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि संस्थांच्या कामकाजापासून सरकारी भरतीपर्यंत विविध विषयांवर प्रश्न विचारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
‘छात्रों की गूंज’मध्ये ‘जेन-झी’ शी संवाद
इंदूरमधील या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी ‘जेन-झी’ आणि इतर तरुणांशी संवाद साधला. शिक्षण, परीक्षा, सरकारी नोकऱ्यांमधील भरती, रोजगार आणि विद्यार्थ्यांसमोरील अडचणी हे कार्यक्रमातील प्रमुख विषय होते.
काँग्रेसच्या युवकांशी संवाद साधण्याच्या या उपक्रमाअंतर्गत ‘छात्रों की गूंज’चे हे पाचवे आयोजन होते.
