NEET परीक्षा पेपरफुटी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाबाहेर अचानक ठिय्या आंदोलन सुरू केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मात्र, काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेवर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल गांधींचे हे आंदोलन म्हणजे मूळ समस्येवरून लक्ष विचलित करण्याचा आणि विद्यार्थ्यांचा लढा कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप ‘आप’ने केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान निवासाबाहेर काही तास चाललेल्या या हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन आंदोलनस्थळावरून हटवले.
संजय सिंह यांचे काँग्रेसवर आरोप
‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“देशातील करोडो तरुणांच्या भविष्यासाठी सोनम वांगचुक गेल्या २३ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जंतरमंतरवर देशभरातील तरुण आंदोलन करत आहेत. २० जुलै रोजी या युवकांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. काँग्रेस गेल्या महिन्याभरापासून या आंदोलनाला नावे ठेवत होती आणि आता राहुल गांधी म्हणतात की, ‘जंतरमंतरवर जाऊ नका, आमच्या धरण्यात सामील व्हा.’ काँग्रेसला तरुणांचे हे आंदोलन कमकुवत का करायचे आहे? ते जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन का करत नाहीत?” असा सवाल संजय सिंह यांनी विचारला.
‘राहुल गांधी भाजपच्या दबावाखाली?’; आपचा थेट सवाल
विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक देशभक्त नागरिकाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले होते. या आंदोलनाची दखल घेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी जाऊन राहुल गांधींशी चर्चाही केली. मात्र, आम आदमी पक्षाने या संपूर्ण घडामोडींवर जोरदार टीका केली आहे.
“राहुल गांधी या महत्त्वाच्या मुद्द्याला कमकुवत करत आहेत. भाजप आणि काँग्रेस मिळून या आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत का? त्यांना खरोखरच विद्यार्थ्यांचे समर्थन करायचे असेल, तर त्यांनी जंतरमंतरवर जाऊन मुख्य आंदोलनाला पाठिंबा द्यावा,” असा सवाल ‘आप’चे नेते सोमनाथ भारती यांनी केला.
तसेच ‘आप’चे आमदार सौरभ भारद्वाज यांनी काँग्रेसवर निशाना साधत म्हटले की, “जंतरमंतरवर गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे, तिथे जाण्यास सरकारचा एकही प्रतिनिधी तयार नव्हता. पण राहुल गांधींच्या एका तासाच्या आंदोलनासाठी केंद्रीय मंत्री आणि सचिव धावून आले. राहुल गांधींना जंतरमंतरवर जाऊन लोकांमध्ये मिसळायचे नाही, तर आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांच्या गर्दीतच राहून प्रसिद्धी मिळवायची आहे.”
जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचा एल्गार कायम
दुसरीकडे, NEET पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या युवा संघटनेच्या बॅनरखाली शेकडो विद्यार्थी जंतरमंतरवर ठिय्या देऊन बसले आहेत. नुकताच संसदेवर धडक मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अश्रूधुर आणि लाठीमार केला होता. मात्र, पोलिसांच्या या दडपशाहीला न घाबरता आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
आंदोलकांची आक्रमक भूमिका: “पोलिसांची दडपशाही झाली तरी आमचे आंदोलन थांबणार नाही, आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार,” असा इशारा या युवा आंदोलनाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिला आहे.
सोनम वांगचुक यांना पाठिंबा: प्रसिद्ध समाजसेवक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तीन आठवड्यांचे उपोषण सुरू केले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्याने विद्यार्थ्यांमधील संताप आणखी वाढला आहे.
सोशल मीडियावर पोलिसांच्या लाठीमाराचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, देशभरातून या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत ११८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ६० आंदोलक असे एकूण १८० जण जखमी झाले आहेत.
