काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून एक पोस्ट त्यांनी लिहिली आहे. ज्यात त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोचं वर्णन करताना राहुल गांधी म्हणतात की अमित शाह यांचे गुंड आंदोलकांना मारहाण करत आहेत. तसंच या आंदोलनात सहभागी झालेल्या मुली आणि स्त्रियांचाही विचार करताना दिसत नाहीत असं म्हटलं आहे.

काय आहे राहुल गांधी यांची पोस्ट?

अमित शाह यांचे दिल्ली पोलीस आता गुंडगिरी करत आहेत. RSS-भाजपाच्या गुंडाना महिलांवरही वाट्टेल तशी कारवाई करा अशी मुभा देण्यात आली आहे. त्यांना हिंसा माजवण्यासही काहीही बंदी घातली गेलेली नाही. मॉगेम्बो मोदी आणि त्यांचं सरकार जेवढी दडपाशाही करेल तेवढ्याच ताकदीने युवा वर्ग आणि जेन झी त्याचं उत्तर देतील. १२ ऑक्टोबरला काँग्रेसही सीजेपीच्या मोर्चात सहभागी होणार आहे. देशातले युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील. पुन्हा एकदा देशात तरूणाईचा आवाज घुमेल. हा आवाज आधीपेक्षा जास्त असेल हे सरकारने विसरू नये.

अमित शाह यांनाही टॅग करत मांडली भूमिका

पुढे राहुल गांधी म्हणतात, अमित शाह यांना सांगू इच्छितो, १० हजार, २० हजार, ४० हजार पोलीस आणा, भाजपा, आरएसएसचे गुंड बोलवा आम्ही घाबरणार नाही आणि मागे हटणार नाही. ही लढाई आता मुळीच थांबणार नाही हे तुम्ही पण लक्षात ठेवा. सोमवारी आम्ही सरन्यायाधीशांची भेट घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की देशाच्या संविधानाचे कसे तुकडे केले जात आहेत. अशावेळी कायद्याचे रक्षक म्हणून तुम्ही गप्प बसू शकत नाही. तुम्ही डोळ्यांवर पट्टी बांधून सोयीस्कर भूमिका घेऊ शकत नाही. संविधानाच्या चिंधड्या उडणार असतील तर आम्ही गप्प बसू असं मुळीच होणार नाही. तुम्हाला याबाबत उत्तर द्यावंच लागेल असं राहुल गांधी म्हटले आहेत.

दिल्लीतील अनेक व्हिडीओ आणि फोटो पुढे येत आहेत. आजच्या सीजेपीच्या आंदोलनाचे प्रतिनिधित्व अजिंक्य शिंदे करत आहेत. आज अभिजीत दिपके जंतर मंतरवर पोहोचणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी आज दुसऱ्या दिवशी देखील दिल्लीच्या जंतरमंतर आंदोलन करण्यावर ठाम आहे. तसंच अभिजित दिपके यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक ताब्यात घेतलं होतं, पण त्यांची सशर्त सुटका करण्यात आली आहे. दरम्यान अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातं आहे. शनिवारप्रमाणेच रविवारीही दिल्लीतल्या जंतर-मंतर परिसराला छावणीचं स्वरूप आलं आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी पाहण्यास मिळतो आहे. पोलिसांनी या परिसरातील ३७ स्पॉट पूर्णपणे बंद केले आहेत. आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी वल्लभ पंथ मार्गावर मोठ्या प्रमाणात राखीव बसेस उभ्या करण्यात आल्या आहेत