केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या डिजिटल मूल्यमापन प्रणालीतील (OSM) गैरव्यवहार उघड करणार्या सार्थक सिध्दांत या १८ वर्षीय तरूणाचे काँग्रेसनेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भरभरून कौतुक केले आहे. देशातील मोठ्या तपास यंत्रणा आणि प्रसारमाध्यमांना जे जमले नाही, ते या तरूणाने करून दाखवले, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सार्थक आणि त्याचा सहकारी निसर्ग अधिकारी यांचे कौतुक केले.
सार्थक आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली.
“तरुणांनी सीबीआयपेक्षाही वेगवान काम केले”
राहुल गांधी म्हणाले की, “सार्थक अवघा १८ वर्षांचा आहे, पण त्याचा विचार, धैर्य आणि तत्त्वे कोणापेक्षाही कमी नाहीत. एका १८ वर्षांच्या तरुणाने केंद्रीय तपास यंत्रणेपेक्षा अधिक वेगाने आणि हुशारीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. हा तरुणांचा विजय असून खऱ्या अर्थाने सरकारचा पराभव आहे.”
पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा
या प्रकरणाचा दाखला देत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, “मोदीजींना वाटते की आपल्या देशातील तरुणांनी प्रश्न न विचारता, डोळे बंद करून फक्त रील बनवत राहावे आणि पकोडे तळत बसावे. परंतु, या तरुणांनी यंत्रणेला धाडसाने प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरेही शोधून काढली.” हेच भारताचे खरे तरुण आहेत, जे जागरूक आणि माहितीपूर्ण आहेत, असेही गांधी यांनी नमूद केले.
काय आहे ‘OSM’ वाद?
CBSE ने इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पारंपारिक पद्धतीऐवजी ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ ही डिजिटल प्रणाली लागू केली होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकांवरील हस्ताक्षर आपले नसल्याचा आरोप केला. यामुळे उत्तरपत्रिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अदलाबदल झाल्याचा संशय निर्माण झाला. सार्थक सिद्धांत याने याच निविदा प्रक्रियेतील त्रुटी आणि गैरव्यवहार शोधून काढले.
संसदीय समितीसमोर सादरीकरण आणि काँग्रेसची मागणी
सार्थकने नुकतेच या गैरव्यवहाराबाबत एका संसदीय समितीसमोर सादरीकरण देखील केले आहे. या वादामुळे सरकारने सीबीएसईच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरून हटवले आहे, परंतु काँग्रेसने या कारवाईला केवळ कव्हरअप करणे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
