नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना बहुमत मिळाल्यास काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा दावा करण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) महासचिव एम. ए. बेबी यांनी सोमवारी व्यक्त केले. मात्र, पंतप्रधानपदाचा अंतिम निर्णय निवडणुकीपूर्वी नव्हे, तर निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी एकत्रितपणे घ्यावा, असेही बेबी यांनी सांगितले.

बेबी यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांच्या संभाव्य नेतृत्वाच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तसेच, राष्ट्रीय स्तरावर ‘इंडिया’ आघाडी अधिक बळकट करण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असल्याने, विरोधकांना लोकसभेत बहुमत मिळाल्यास सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या प्रक्रियेत त्यांना पुढाकार घेता येईल, असे बेबी यांनी सूचित केले.

‘यूपीए-१’च्या काळात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला ‘माकप’ने पाठिंबा दिला होता. अमेरिकेशी झालेल्या अणुकराराच्या मुद्द्यावरून डाव्या पक्षांनी काँग्रेसच्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. आता पुन्हा एकदा ‘माकप’ व डावे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संभाव्य सरकारला पाठिंबा देण्याबाबत विचार करत असल्याचे दिसते. पंतप्रधानपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वीच निश्चित करण्याबाबत मात्र बेबी यांनी सावध भूमिका घेतली. विरोधकांनी आधी निवडणूक जिंकणे आणि बहुमत मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर सरकारचे नेतृत्व कोण करणार, याचा निर्णय घेता येईल, असे त्यांनी सांगितले.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री व ‘टीव्हीके’ पक्षाचे संस्थापक-प्रमुख जोसेफ विजय यांचे नावही भविष्यातील पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे. मात्र त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नसल्याचे बेबी यांनी स्पष्ट केले.