Priyanka Gandhi : ओडिशातील पोलिसांनी लष्कराच्या जवानाला मारहाण करत त्याच्या होणाऱ्या पत्नीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली होती. १४ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यातच हा सगळा प्रकार घडला होता. दरम्यान, या घटनेनंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाष्य करत भाजपा सरकारला लक्ष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ओडिशातील घटनेने देशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मदत मागण्यासाठी गेलेल्या लष्कारातील जवानाला मारहाण करण्यात आली आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचा लैंगिक छळही करण्यात आला आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी या घटनेवरून भाजपा सरकारवरही टीका केली. भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार पूर्णपणे अनियंत्रित झाला आहे. सरकारी यंत्रणेकडूनच अन्याय होत असेल, तर नागरिकांनी मदत मागण्यासाठी कुणाकडे जावं? असे ते म्हणाले. तसेच याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रियांका गांधींचीही भाजपा सरकारवर टीका
राहुल गांधींबरोबरच कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही या घटनेवरून केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं. लष्कारातील जवानाच्या पत्नीचा लैंगिक छळही झाल्याची घटना धक्कादायक आहे. अयोध्येतही सामुहिक बलात्कार झालेल्या पीडित तरुणीशी पोलिसांनी गैरवर्तन केलं आहे. तिला न्याय देण्याऐवजी गुन्हा मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला, कारण आरोपी भाजपाशी संबंधित आहेत. देशाभरातील भाजपा सरकार पोलिसांना रक्षक नाही, तर भक्षक बनवण्याचं धोरणं अवलंबत आहे, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. तसेच अशा परिस्थितीत महिलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नेमकं प्रकरण काय?
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला १४ सप्टेंबर रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास रेस्टॉरंटमधून तिच्या होणाऱ्या पतीबरोबर घरी जात असताना काही तरुणांनी तिची छेड काढली. त्यामुळे तिने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तक्रार नोंदवून न घेता तेथील महिला पोलिसांनी तिच्याशी गैरवर्तन करत तिला शिवीगाळ केली.
महिलेने केलेल्या आरोपानुसार, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. याउलट दोघांविरोधात गुन्हा दाखल करत तिच्या होणाऱ्या पतीला अटक केली. पीडित महिलेने त्याचा विरोध केला असता, त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केले. तेवढ्यात काही पुरुष पोलीस कर्मचारीही त्याठिकाणी आले. त्यांनी महिलेच्या जॅकेटने तिचे हात तसेच अन्य एका महिला पोलिसांच्या स्कार्फने तिचे पाय बांधले. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेची अंतर्वस्र काढत तिच्या छातीवर लाथ मारली. तसेच त्याठिकाणी उपस्थित असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनीही तिला मारहाण केली.
याप्रकरणी पाच पोलीस कर्मचारी निलंबित
दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर राज्य सरकारने याप्रकरणी कारवाई करत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह पाच जणांना निलंबित केलं आहे. यामध्ये दोन महिला पोलिसांचाही समावेश आहे.