काँग्रेसचे वायनाडमधील उमेदवार राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बुधवारी परखड शब्दांत टीका केली. कर्नाटकमधील सेक्स स्कँडल प्रकरणी भाजपाकडून घेण्यात आलेल्या भूमिकेवर राहुल गांधी व प्रियांका गांधींनी टीका केली आहे. एकीकडे राहुल गांधींनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला असताना दुसरीकडे प्रियांका गांधींनी आसाममधील प्रचारसभेत भाजपावर टीकास्र सोडलं आहे. कर्नाटकमधील सेक्स स्कँडल प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रज्वल रेवण्णा हे भाजपाच्या मित्रपक्षाचे खासदार व सध्याचे उमेदवार असल्यामुळे भाजपासमोर अडचणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चा आहे ती कर्नाटकमधील प्रज्वल रेवण्णा प्रकरणाची. प्रज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू तर संयुक्त जनता दलाचे यंदाचे लोकसभा उमेदवार आहेत. भाजपानं जदयुसोबत आघाडी केली असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रज्वल रेवण्णा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. मात्र, सेक्स स्कँडलप्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणाचे हजारो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरून विरोधकांनी पंतप्रधानांना घेरण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणावरून लक्ष्य केलं आहे. “नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकमध्ये महिलांविरोधात घडलेल्या घृणास्पद गुन्ह्याबाबत निर्लज्ज मौन बाळगलं आहे. मोदींना याचं उत्तर द्यावं लागेल की सर्व काही माहिती असूनही भाजपानं शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीचा प्रचार का केला? फक्त मतासाठी? इतका मोठा गुन्हेगार देशातून पळून जाऊच कसा शकतो?” असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.

सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या नातवासाठी देवेगौडांनी सोडला होता मतदारसंघ; कुटुंबात राजकीय दुफळी

“मोदींचा राजकीय परिवार गुन्हेगारांसाठी सुरक्षेची गॅरंटी?”

“कैसरगंजपासून कर्नाटक आणि उन्नाओपासून उत्तराखंडपर्यंत महिलांच्या गुन्हेगारांना पंतप्रधानांचं मूक समर्थन देशभरातील गुन्हेगारांचं धैर्य वाढवत आहे”, असंही राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. याशियाव, “मोदींच्या राजकीय कुटुंबाचा भाग असणं या अशा गुन्हेगारांसाठी सुरक्षेची गॅरंटी आहे का?” असा सवालही त्यांनी केला आहे.

प्रियांका गांधींचीही आगपाखड!

दरम्यान, दुसरीकडे आसाममधील प्रचारसभेत प्रियांका गांधींनीही पंतप्रधान मोदी व भाजपावर टीका केली आहे. “हे लोक महिला सुरक्षेच्या गोष्टी करतात. तुम्ही कर्नाटकमध्ये काय घडलं ते पाहिलंच असेल. त्यांच्या पक्षाशी संबंधित लोकांनी भयंकर गुन्हा केला आहे. हजारो व्हिडीओ बाहेर आले आहेत. पण आपल्याला काय दिसतं? हे सर्व गुन्हे करणाऱ्या व्यक्ततीसाठी मोदींनी प्रचारसभा घेतल्या. हा गुन्हेगार देशातून पळून गेला आणि कुणीही त्याला थांबवलं नाही. ना मोदींनी ना अमित शाहांनी. जेव्हा कधी महिलांविरोधात गुन्हे घडतात, तेव्हा मोदी मौन धारण करतात. किंबहुना, ते गुन्हेगारांना संरक्षणच देतात”, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

Sex Scandal: प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्याच्या वडिलांना समन्स, एसआयटी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

“मणिपूरमध्ये एका जवानाच्या पत्नीची नग्नावस्थेत रस्त्यावरून धिंड काढण्यात आली. सगळ्यांनी तो व्हिडीओ पाहिला. मोदी आणि शाहांनीही पाहिलाच असेल. मग ते यावर शांत का राहिले?” असा सवालही प्रियांका गांधींनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi priyanka hits at pm narendra modi amit shah on prajwal revanna sex scandal case pmw