नवी दिल्ली : काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (सीएपीएफ) जवानांना नेतृत्वाच्या संधी नाकारणारी भेदभावपूर्ण व्यवस्था मोडीत काढली जाईल आणि जवानांना त्यांचे हक्क व विशेषाधिकार मिळवून दिले जातील, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) शौर्य दिनानिमित्त राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर म्हटले की, ‘सीआरपीएफ शौर्य दिनानिमित्त, मी आपल्या दलातील धाडसी आणि शूर सैनिकांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. तुमचे धैर्य आणि बलिदान दररोज आपल्या राष्ट्राचे रक्षण करते. सीमांवर तैनात राहून तुम्ही देशाला सुरक्षित ठेवता; तुम्ही दहशतवाद आणि नक्षलवादाच्या संकटांचा सामना करता आणि लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव, आपल्या निवडणुका शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडतील याची खात्री करता.’
नेतृत्वाच्या संधी नाकारण्यापासून ते वेतन, कल्याण आणि सन्मानाबाबतच्या संस्थात्मक अन्यायामुळे सैनिकांचे मनोबल खच्ची होते. ही केवळ कारकीर्दीमधील प्रगतीची बाब नाही; हा मूलभूतपणे न्याय आणि सन्मानाचा विषय आहे. काँग्रेस सरकार स्थापन झाल्यावर आम्ही ही भेदभावपूर्ण व्यवस्था मोडीत काढू आणि सीएपीएफ जवानांना त्यांचे पूर्ण हक्क आणि विशेषाधिकार मिळतील याची खात्री करू, असे आश्वासन राहुल यांनी दिले.
सीएपीएफ विधेयकाविरोधात दिल्लीत निदर्शने नवी दिल्ली : निमलष्करी जवानांचे कुटुंबीय आणि निवृत्त अधिकार्यांनी बुधवारी ‘केंद्रीय सशस्त्र पोलीस दल’ (सीएपीएफ)विधेयकाविरोधात दिल्लीतील राजघाट येथे निदर्शने केली. महिलांचा अधिक सहभाग असलेल्या या निदर्शकांनी ‘सीएपीएफ (सामान्य प्रशासन) विधेयक, २०२६’ हे विधेयक मागे घ्यावे आणि या दलांमधील संवर्ग अधिकारी व जवान यांना वेळेवर पदोन्नती द्यावी, अशी मागणी केली. ‘
सीएपीएफ विधेयक मागे घेण्यात यावे आणि गेल्या १५ ते १७ वर्षांपासून पदोन्नतीअभावी एकाच पदावर अडकून पडलेल्या संवर्ग अधिकारी व जवानांना न्याय मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन केले,’ असे ‘अलायन्स ऑफ ऑल एक्स-पॅरामिलिटरी फोर्सेस वेल्फेअर असोसिएशन’चे सरचिटणीस रणबीर सिंग यांनी सांगितले.
