नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि मतदार यादीच्या फेरआढाव्याची विशेष मोहीम रद्द करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांनी मोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापासून अध्र्या किमीवर असलेल्या आकाशवाणीच्या आवारात ठाण मांडले. अखेर साडेदहा तासांनंतर पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतले.
‘ज्ञानेश कुमार यांना भेटल्याशिवाय येथून हटणार नाही. त्यांनी मतचोरी केली असून ही बाब मला त्यांना भेटून स्पष्ट शब्दांत सांगायची आहे,’ अशी आक्रमक भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. राहुल गांधी तिथून हटायला तयार नसल्यामुळे आकाशवाणीच्या परिसराला रात्री उशिरापर्यंत पोलीस आणि निमलष्करी दलांचा वेढा पडलेला होता.
राहुल-प्रियंकाचा चकवा
संसदेच्या मकरद्वारापासून निघालेल्या इंडिया आघाडीच्या मोर्चाचे नेतृत्व राहुल गांधींनी केले. हा मोर्चा संसदेपासून काही अंतरावर निती आयोग व आकाशवाणीसमोर अडवला गेला. राहुल गांधी हातात तिरंगा घेऊन बॅरिकेड्सवर चढले होते. सुमारे दीड तास घोषणाबाजी केल्यानंतर सुरक्षा जवानांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष व इतर पक्षाच्या नेत्यांची धरपकड केली. त्यामध्ये राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा यांचाही समावेश होता. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन बसगाडीमध्ये बसवले मात्र, अवघ्या काही सेकंदात पोलिसांना चकवा देऊन दोघेही खाली उतरले आणि कोणाच्याही लक्षात येण्याच्या आत समोर असलेल्या आकाशवाणीच्या दारातून आता घुसले. सुरक्षारक्षकांनी अडवण्याचा अपयशी प्रयत्न केला. तिथून मागच्या बाजूला असलेल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्याचा त्यांचा इरादा होता. हा डाव यशस्वी न झाल्याने राहुल गांधी व काँग्रेस नेत्यांनी आवारातील झाडाखाली सुमारे एक वाजल्यापासून ठाण मांडले. राहुल गांधींच्या या एकप्रकारच्या गनिमी काव्यामुळे सुरक्षा यंत्रणा हैराण झालेली दिसली.
निवडणूक प्रक्रियेशी खेळणार्यांना शिक्षा होणारच!
‘देशातील कोट्यवधी जनतेने आम्हाला मतदान केले आहे आणि आम्हाला त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार दिला आहे. मग निवडणूक आयोग आमच्याशी चर्चा का करत नाही? बंगाल, हरियाणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत आम्ही प्रश्न विचारत आहोत, मात्र निवडणूक आयोग या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार नाही. जर मतचोरी केली नसती, तर त्यांनी आम्हाला एका मिनिटात भेटण्याची तयारी दाखवली असती. ३०० हून अधिक विरोधी खासदार संसदेतून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे चालत आले आहेत. आम्ही कोट्यवधी भारतीयांचे प्रतिनिधित्व करतो. मग निवडणूक आयुक्त आमची भेट का घेत नाहीत? पोलीस आम्हाला अडवत आणि धमकावत का आहेत, असा सवालही राहुल गांधी यांनी केला. आम्ही संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत आहोत. या सर्वांनी देशाच्या निवडणूक प्रक्रियेशी छेडछाड केली असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल, असेही राहुल गांधी म्हणाले.
मतचोरी नाही तर, भेटत का नाही?
राहुल गांधी यांनी मंगळवारी आकाशवाणीच्या आवारात ठिय्या आंदोलन करताना पत्रकारांशी संवाद साधत, केंद्रीय निवडणूक आयोगावर कडवी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सगळे मिळून देशाची निवडणूक प्रक्रिया उद्ध्वस्त करत आहेत, असा आरोप केला. ह्य्आम्हाला भाजप काय म्हणते, याची पर्वा नाही. मी देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी येथे उभा आहे. माझ्याबरोबर लोकसभेचे आणि राज्यसभेचे ३०० हून अधिक खासदार आले आहेत आणि तेही लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी येथे आले आहेत. आम्हाला फक्त मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांची भेट घ्यायची आहे. आम्हाला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही मतचोरी केली आहे. आम्ही इथे (आकाशवाणीच्या समोर) बसण्यास तयार आहोत. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आम्ही इथे बसू. आम्हाला इथे बसू द्यायचे नसेल, तर दिल्लीतील कोणतेही ठिकाण सांगा, आम्ही तेथे जाऊन बसू,’ असे राहुल गांधी म्हणाले.
कोठे बसून आंदोलन करू?
राहुल गांधींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या गाड्या आकाशवाणीच्या आवारात गेल्या पण, राहुल गांधींना त्यांनी ताब्यात घेणे टाळले. काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल, पवन खेरा, दीपेंद्र हुड्डा, प्रणिती शिंदे आणि चरणजीतसिंग चन्नी, इम्रान प्रतापगढी, श्रीनिवास बीव्ही यांच्यासह अन्य नेतेही राहुल गांधींबरोबर होते. राहुल गांधींना अडवण्यासाठी पोलीस फाटा आवारात आणि हजारोंच्या संख्येने असलेले दिल्ली पोलीस, शीघ्र कृती दल, केंद्रीय राखीव दल, इंडो-तिबेट सीमा दल अशा निमलष्करी दलांचे जवान रस्त्यावर उभे राहिले होते. दिवसभर दोन्ही बाजूंकडून वाट पाहण्याचा खेळ सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
आकाशवाणीच्या दरवाजासमोर वर्षा गायकवाड, श्यामकुमार बर्वे, प्रशांत पडोळे आदी खासदारांनी ठिय्या दिला होता. निदर्शनादरम्यान राहुल गांधी म्हणाले, ‘आम्हाला इथे (आकाशवाणीच्या आवारात) बसण्यात काहीच अडचण नाही. आम्ही इथे नीट आहोत. आम्ही इथे चटया अंथरल्या आहेत. इथे शौचालय वगैरेची सुविधा आहे. चहाचीही सोय आहे. आम्हाला जितका वेळ लागेल तितका वेळ आम्ही इथे बसून राहू’, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
‘नाटक किती काळ चालणार?’
नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष तसेच राहुल गांधी सातत्याने घटनात्मक संस्थांवर हल्ले करत आहेत, असा आरोप संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी केला. याचा लोकशाहीला किंवा जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाला काहीच फायदा होणार नाही. राहुल गांधी यांनी हे रोजचे नाटक थांबवावे असा टोला रिजिजू यांनी लगावला. त्यांचे हे नाटक २०१४ पासून सुरू असून ते किती काळ चालणार, असा सवाल रिजिजू यांनी केला.
