पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘७, लोककल्याण मार्ग’ या निवासस्थानाबाहेर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी अचानक सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या नाट्यमय घडामोडींनंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या संपूर्ण वादावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण आलं असून, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर दिलेला शब्द पाळला नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पंतप्रधानांच्या निवासाबाहेर जोरदार निदर्शने

वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर रस्त्यावरच ठिय्या मांडत काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

विरोधी पक्षांची समजूत काढण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांना घटनास्थळी पाठवले होते. मात्र, चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी आपली भूमिका बदलल्याचा दावा जितेंद्र सिंह यांनी केला आहे.

…आणि राहुल गांधींनी मागणी बदलली!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर (ट्विटर) पोस्ट शेअर करत जितेंद्र सिंह यांनी चर्चेचा सविस्तर घटनाक्रम मांडला आहे.

“आम्ही राहुल गांधींना हे आंदोलन मागे घेण्याची नम्र विनंती केली. कारण ती जागा आंदोलनासाठी योग्य नव्हती आणि यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास होत होता. यावर, सरकारने संसदेत ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या गोंधळावर चर्चेची मागणी मान्य केल्यास आंदोलन लगेच मागे घेऊ, अशी अट राहुल गांधींनी ठेवली होती.” – जितेंद्र सिंह, केंद्रीय राज्यमंत्री

मंत्र्यांच्या दाव्यानुसार, वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून अवघ्या काही मिनिटांतच राहुल गांधी यांची ही मागणी मान्य करण्यात आली आणि सरकार संसदेत चर्चेला तयार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

परंतु, मागणी मान्य झाल्याचे कळताच राहुल गांधींनी आपली भूमिका बदलल्याचा दावा सिंह यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, “केवळ चर्चेने भागणार नाही, तर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची हमीही सरकारला द्यावी लागेल. आता माझ्या दोन मागण्या आहेत—संसदेत चर्चा आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.” जेव्हा त्यांना आधीच्या मागणीची आठवण करून दिली, तेव्हा “आता माझ्या मागण्या बदलल्या आहेत,” असे उत्तर त्यांनी दिल्याचे जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.

‘ही भूमिका लोकशाहीला शोभणारी नाही’

गृहसचिवांनी आंदोलनाची जागा योग्य नसल्याचे सांगितल्यावर, “मी कुठेही बसू शकतो, हा माझा अधिकार आहे,” असे राहुल गांधींनी उत्तर दिल्याचे जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.

आपल्या पोस्टच्या शेवटी जितेंद्र सिंह यांनी काँग्रेसच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. “राहुल गांधींसारख्या ज्येष्ठ नेत्याने आणि देशाच्या विरोधी पक्षनेत्याने स्वतःच्या शब्दावरून मागे हटणे अत्यंत दुर्दैवी असून, ते लोकशाहीच्या तत्त्वांच्या पूर्णपणे विरोधी आहे. सरकार ‘नीट’ संदर्भात संसदेत चर्चा करण्यास पूर्णपणे तयार आहे. मात्र, काँग्रेस पक्षाने नियमानुसार या गंभीर विषयावर औपचारिक चर्चेसाठी अजूनपर्यंत कोणतीही नोटीस दिलेली नाही,” असा दावाही त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस किंवा राहुल गांधी यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.