सर्वोच्च न्यायालय परिसरात याचिका दाखल करण्यासाठी आलेल्या राहुल गांधींनी एका गरोदर महिला पत्रकाराला धक्का दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं संमती दर्शवली आहे. दसरा सुट्टीनंतर न्यायालयाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर या प्रकरणाची नियमित सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. सध्या सर्वोच्च न्यायालयाला दसऱ्याची एक आठवड्याची सुट्टी असून न्यायालय २६ ऑक्टोबर रोजी पुन्हा सुरू होणार आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?
ज्येष्ठ वकील गौरव भाटिया यांनी खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी १२ ऑक्टोबर रोजी मतदार यादीच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या वेळी झालेल्या प्रचंड गोंधळादरम्यान गर्दीत राहुल गांधी यांनी एका गरोदर महिला पत्रकाराला धक्का दिल्याची घटना घडल्याचा आरोप भाटिया यांनी केला.
यापूर्वी गुरुवारीही भाटिया यांनी या विषयाचा उल्लेख न्यायालयासमोर केला होता. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांच्या झालेल्या कथित छळाप्रकरणी न्यायालयानं नोटीस बजावली आहे. याच धर्तीवर राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या बातमीचीही न्यायालयानं दखल घ्यावी, अशी मागणी भाटिया यांनी केली होती.
‘तोडी सांगण्यावरून दखल घेणार नाही, रीतसर याचिका दाखल करा’
मात्र, सर्वोच्च न्यायालयानं तोंडी वक्तव्याच्या आधारे स्वतःहून दखल घेण्यास स्पष्ट नकार दिला. “केवळ तोंडी सांगण्यावरून आम्ही दखल घेऊ शकत नाही. तुम्ही रीतसर याचिका दाखल करा, आम्ही नक्कीच तिचे परीक्षण करू,” असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. त्यानुसार आता रीतसर याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालय यावर सुनावणी घेणार आहे.
सरन्यायाधीशांनी भेट नाकारली होती
या घटनेपूर्वी राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली होती. निवडणूक आयोगाचे कामकाज, विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई आणि दिल्ली मेट्रो स्थानके बंद ठेवणे या मुद्द्यांवर त्यांना चर्चा करायची होती. मात्र, हे सर्व विषय आधीच न्यायालयात प्रलंबित असल्याने सरन्यायाधीशांनी विरोधी नेत्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला होता.
