लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी शून्य प्रहरात वायुप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. देशातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी हवा पसरली आहे असे म्हणत राहुल यांनी लोकसभेत वायुप्रदूषणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली.

“वायुप्रदूषणाची समस्या विचारसरणीशी संबंधित नाही, या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा एकत्र चर्चा करून उपाय शोधावा,” असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. त्यावर, या मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. यासाठी लोकसभेची कामकाज सल्लागार समिती वेळ देईल, असे ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले, “या मुद्द्यावर आपण संसदेत तपशीलवार चर्चा करायला हवी आणि पंतप्रधानांनी प्रत्येक शहरासाठी पुढील पाच किंवा १० वर्षांसाठी एक पद्धतशीर योजना समोर ठेवावी, जेणेकरून आपल्या जनतेचे आयुष्य सोपे होईल.” वायुप्रदूषण आणि त्यामुळे आपल्या जनतेचे होणारे नुकसान यावर आपण सहकार्य करू शकतो, यावर या सभागृहातील प्रत्येकाचे एकमत होईल, अशी आशा राहुल यांनी व्यक्त केली. सरकारने यासाठी एखादी योजना आखल्यास आम्ही आनंदाने सहकार्य करू असेही त्यांनी सांगितले.

आपली बहुसंख्य प्रमुख शहरे विषारी हवेत जगत आहेत. लाखो मुलांना फुप्फुसाचे विकार होत आहेत. त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. लोकांना कर्करोग होत आहे. वृद्धांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा

आम्ही या विषयावर चर्चा करण्यास तयार आहोत, ही भूमिका सरकारने पहिल्या दिवसापासून स्पष्ट केली आहे. राहुल गांधी यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला आहे. समिती या विषयावर चर्चेसाठी वेळ निश्चित करेल. – किरेन रिजिजू, संसदीय कामकाज मंत्री