महाराष्ट्रात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचा हा संताप केवळ एखाद्या परीक्षेपुरता किंवा भरतीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवरून त्यांचा उडालेला विश्वास दर्शवतो, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत त्यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरले आहे.

विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत; राहुल गांधींचे गंभीर आरोप

केंद्र असो वा राज्य, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे देशातील आणि राज्यातील तरुण वर्ग पूर्णपणे त्रस्त झाला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. पेपर फुटीचे सत्र, वर्षानुवर्षे रखडलेल्या भरती प्रक्रिया, शिक्षणाचा प्रचंड वाढलेला खर्च, वसतिगृहांची दयनीय अवस्था आणि जेवणाचा खालावलेला दर्जा यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तसेच ‘डीबीटी’ (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजनेतील कथित गैरव्यवहारांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘एमपीएससी’सारख्या घटनात्मक संस्थेचं अवमूल्यन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत (MPSC) चिंता व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की, “एमपीएससीसारख्या घटनात्मक संस्थेवर ताबा मिळवून तिची स्वायत्तता आणि विश्वासार्हता पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे.” स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा खेळ सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला.

मागण्या त्वरित मान्य करा, अन्यथा आंदोलन तीव्र होणार

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी विद्यार्थी करत असलेली प्रत्येक मागणी पूर्णपणे रास्त आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी सरकारला तत्काळ पावले उचलण्याचे आवाहन केले. सरकारने विद्यार्थ्यांच्या आवाजाची दखल घेऊन तातडीने कठोर निर्णय घ्यावेत; अन्यथा न्याय मिळेपर्यंत तरुणांचा हा आक्रोश आणखी तीव्र होत जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.