पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाधिकारशाह असल्याची सातत्याने टीका करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशवासियांना दिलेल्या संदेशात नाव न घेता मोदींवर टीका केलीये. यापुढे देशात कोणत्याही बादशहाची एकाधिकारशाही चालणार नाही. कोणावरही कोणतेही विचार लादले जाणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या एका पत्रात म्हटले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी बुधवारी रात्री उशीरा एक पत्र ट्विटरवर प्रसिद्ध केले. या पत्रामध्ये त्यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत भारताने जे काही यश मिळवले आहे, त्याचे सारे श्रेय संपूर्ण देशवासियांना जाते. आपल्या देशाची खरी ताकद या देशातील प्रत्येक नागरिकाच्या आवाजात आहे. हे आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. देशातील सर्वात कमजोर व्यक्तीचा आवाज ऐकून घेणे हेच व्यवस्थेचे ध्येय असले पाहिजे आणि प्रत्येकाच्या आवाजाचे रक्षणही केले गेला पाहिजे, असे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

याच पत्रामध्ये त्यांनी अनेक वर्षांच्या लढ्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य आपण कायद्याच्या चौकटीत याच दिवशी स्वीकारले असल्याचे सांगत यापुढे देशात कोणाचीही बादशाही किंवा मनमानी चालणार नाही. याचाच अर्थ विचारांचे स्वातंत्र्य असलेल्या या देशात कोणत्याही व्यक्तीवर कुठलेही विचार लादले जाणार नाहीत, असे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. भारतीय राज्यघटना संपूर्ण देशाची संपत्ती असून, आपल्या सर्वांना तिचे रक्षण करायचे आहे, असे राहुल गांधी यांनी पत्रामध्ये लिहिले आहे.

राहुल गांधी यांनी याआधीही मोदी आपली एकाधिकारशाही चालवत असल्याची टीका केली होती. ते कोणाचेही म्हणणे ऐकून घेत नाहीत, असा आरोप त्यांनी वेगवेगळ्या सभांमधून केला होता. आता पुन्हा प्रजासत्ताक दिनानिमित्त लिहिलेल्या पत्रातून त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे मोदींवर टीका केली असल्याचे दिसून येते आहे.