लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा शेतकऱ्यांची बाजू घेत आपली भूमिका मांडली आहे. राहुल गांधींनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. राहुल गांधी म्हणाले काहीही झालं तरीही मी देशातल्या शेतकऱ्यांसह ठामपणे उभा आहे. शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क मिळालेच पाहिजेत. त्यांच्या लढाईत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, असं राहुल गांधींनी म्हटलंं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश विकल्याची टीकाही पुन्हा एकदा केली आहे.

काय म्हटलंय राहुल गांधींनी?

“नरेंद्र मोदींनी देश विकला आहे, आपल्या देशातल्या शेतकऱ्यांनाही विकून टाकलंय. तुम्ही माझ्या विरोधात तक्रार दाखल करा, FIR करा, मला शिव्या द्या काय हवं ते करा. माझ्या विरोधात विशेषाधिकार प्रस्तावही आणू शकता. मला यामुळे काहीही फरक पडणार नाही. मी लोकसभेत जे बोललो ते खरं बोललो, तुम्हाला ते आवडलं नाही हा भाग वेगळा आहे. देशाला वास्तव काय याची कल्पना आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे करा, मी इथे शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभा आहे. मी एक इंचही मागे हटणार नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माझा काँग्रेस पक्ष सगळेच शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत आणि कायम राहतील असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

मोदींनी शेतकऱ्यांना विकून टाकलं हे वास्तव आहे-राहुल गांधी

राहुल गांधी पुढे म्हणाले, भारतातले शेतकरी हे एका अर्थाने भारताचा पाया आहेत, भारताचं मूळ आहेत. काँग्रेस आणि संपूर्ण भारताने खाद्य सुरक्षेसाठी संघर्ष केला होता. मात्र नरेंद्र मोदींनी अन्न सुरक्षेच्या धोरणाबाबत आपल्याला फसवलं आहे, शेतकऱ्यांना फसवलं आहे. अमेरिकेशी त्यांनी जो करार केला त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, सफरचंद आणि फळं उत्पादक शेतकरी यांना त्यांनी विकून टाकलं आहे. अनेक वर्षांपासून विदेशातले लोक भारतातल्या कृषि बाजारपेठेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी करार करुन त्यांना या बाजारपेठांचे दरवाजे आपल्या हाताने खुले करुन दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्याप्रमाणेच नरेंद्र मोदी वागत आहेत असाही आरोप राहुल गांधींनी केला.

मोदींना फक्त मित्रांचं भलं कसं होईल हे कळतं-राहुल गांधी

नरेंद्र मोदींना त्यांच्या मित्रांचं म्हणजेच गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांचं भलं कसं करायचं हे माहीत आहे. या लोकांसाठीही ते येत्या काळात बाजारपेठा खुल्या करतील. मका, कापूस, सोयाबीन, फळं ही तर सुरुवात आहे, येणाऱ्या काळात अंबानी, अदाणींना किती गोष्टी मिळतात तुम्ही बघा. भारतातले शेतकरी आणि संपूर्ण देशाला हे माहीत आहे की नरेंद्र मोदी हे शेतकरी विरोधी आहेत. नरेंद्र मोदी फक्त त्यांच्या मित्रांचीच मदत करतात. अशीही टीका राहुल गांधींनी केली.