Rahul Gandhi Savarkar Defamation Case: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाकडून मानहानीच्या खटल्यात दिलासा मिळाला आहे. विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील टिप्पणीप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कायद्यानुसार आवश्यक असलेली मंजुरी दिली नसल्याचे न्यायालयाने नमूद करत, सर्वोच्च न्यायालयाने खटला रद्द केला आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान केले होते वक्तव्य
राहुल गांधी यांनी २०२२ मध्ये ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान सावरकरांबाबत वक्तव्य केले होते, याप्रकरणी त्यांच्याविरोधात मानहानीच्या खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी कायदा आणि नियमांनुसार उत्तर प्रदेश सरकारकडून आवश्यक असलेली मंजुरी मिळाली नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.
न्यायालय काय म्हणाले?
पीटीआयने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, “खटल्यासाठी आवश्यक मंजुरी मिळालेली नाही असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदारांच्या वकिलांनी हे स्पष्ट केले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, तक्रार आणि दंडाधिकाऱ्यांनी दिलेले सर्व आदेश रद्द केले जात आहेत,” असे खंडपीठ म्हणाले.
शिंदेसेनेच्या वंदना डोंगरे यांनी दाखल केली होती तक्रार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पदाधिकारी वंदना डोंगरे यांनी राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप डोंगरे यांनी केला होता.
या तक्रारीच्या आधारे ठाणे नगर पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (मानहानी) आणि ५०१ (मानहानीकारक मजकूर छापणे) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
