“महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे…”; राहुल गांधींची मोदी सरकारकडे मागणी

पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केंद्राकडे केली मागणी

केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली पाहिजे असं मत  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाराष्ट्रासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असल्याचे मत व्यक्त करत केंद्राने राज्याला पूर्ण पाठिंबा देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला केंद्राने अधिक मदत करायला हवी का अशा संदर्भातील प्रश्न राहुल गांधी यांना विचारला. “महाराष्ट्र हे एक मोठं राज्य तर आहेत शिवाय ते एक अद्वितीय राज्य आहे. महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राचा पूर्ण पाठींबा मिळायला हवा,” असं मत राहुल गांधी यांनी या प्रश्नाला उत्तर देताना मांडलं. “सर्वच राज्यांना केंद्र सरकारने मदत करायला हवी. कारण राज्य सरकारच्या माध्यमातूनच करोनाविरुद्धची लढाई लढणे अधिक सोयीस्कर ठरेल. राज्य सरकारने या लढाईचे नेतृत्व करु शकतात. व्यवस्थापन पाहणे हे केंद्र सरकाचे काम असून राज्य सरकारांनी प्रत्यक्षात अंमलबाजवणी करण्याचे काम केलं पाहिजे. केंद्राचं काम मॅनेज करायचं आहे तर राज्यांचं काम ऑपरेट करण्याचं,” असंही राहुल यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

“ज्यापद्धतीने केंद्र सरकारने राज्य सरकारांना पैसे दिले पाहिजेत त्यापद्धतीने निधी पुरवला जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे. यासंदर्भात त्यांची विचारसरणी वेगळी असेल. केंद्रीयकरणाच्या माध्यमातून (म्हणजेच सेंट्रलायझेशनच्या माध्यमातून) या संकटाला तोंड देण्याची त्यांची योजना असेल. पण मला असं वाटतं नाही. माझ्या मते त्यांनी राज्य सरकारांच्या माध्यमातून काम करण्याची गरज आहे,” असा सल्लाही राहुल गांधी यांनी दिला.

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला जाहीर करण्यात आलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर पुनर्विचार करावा असा सल्लाही दिला आहे. शेतकरी, मजुरांच्या थेट खिशात पैसे द्या या मागणीचा यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला. “शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्या. सरकारने रेटिंग्स, जगातील प्रतिमेचा विचार आज करु नये. शेतकरी, मजूर, महिला, तरुण देशाचं रेटिंग्स बनवतात,” असंही यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rahul gandhi says maharashtra is center of economy of india central government should help all states scsg