पीटीआय, समालखा (हरियाणा) : ‘‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अधिक जबाबदारीने बोलले पाहिजे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समाजातील स्वीकारार्हतेसंदर्भातील वास्तव त्यांनी पहावे,’’ असा सल्ला संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी मंगळवारी राहुल यांना दिला. राहुल यांनी त्यांच्या अलीकडच्या भाषणांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेवर त्यांनी भाष्य केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या अखेरच्या दिवशी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना होसबाळे बोलत होते. संघाविरुद्ध राहुल गांधींच्या अलीकडील वक्तव्यांविषयी विचारले असता, होसबाळे म्हणाले, की राहुल त्यांच्या ‘राजकीय धोरणा’नुसार काम करत असावेत. परंतु संघ राजकीय क्षेत्रात काम करत नसल्याने संघाची त्यांच्याशी प्रतिस्पर्धा नाही. एका राजकीय पक्षाचे नेते या नात्याने त्यांनी अधिक जबाबदारीने वक्तव्ये केली पाहिजेत.
ब्रिटनमध्ये राहुल यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना होसबाळे यांनी सांगितले, की ज्यांनी अवघा देश एके काळी ‘कारागृह’ केला होता, त्यांना लोकशाहीवर भाष्य करण्याचा अधिकार नाही. संघाच्या मुस्लिमांशी संपर्काबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना होसबाळे यांनी स्पष्ट की, संघाचे नेते केवळ त्यांच्या आमंत्रणावरून मुस्लीम विचारवंत आणि त्यांच्या आध्यात्मिक नेत्यांना भेटत आहेत. होसबाळे यांनी हेही स्पष्ट केले, की समिलगी विवाहाच्या मुद्दय़ावर केंद्र सरकारच्या भूमिकेशी संघ सहमत आहे. विवाह फक्त दोन विरुद्ध लिंगी व्यक्तींत होऊ शकतो, यावर सरकारप्रमाणेच संघाचाही विश्वास आहे.
‘भारत आधीपासूनच हिंदू राष्ट्र!’
भारत हे आधीपासूनच एक हिंदू राष्ट्र आहे. ही एक ‘सांस्कृतिक संकल्पना’ आहे, असेही होसबाळे यांनी यावेळी सांगितले. हे स्पष्ट करताना ते म्हणाले, की राष्ट्र व राज्यव्यवस्था या दोन भिन्न गोष्टी आहेत. राष्ट्र ही ‘सांस्कृतिक संकल्पना’ असली, तरी राज्यव्यवस्था ही घटनात्मक चौकटीत प्रस्थापित केलेली असते.