करोना आटोक्यात येत असल्याचं चित्र देशात दिसत असतानाच जगात या विषाणूच्या एका नव्या प्रकाराने डोकं वर काढलं आहे. करोनाचा हा नवा ओमिक्रोन व्हेरिएंट जगभरासाठी डोकेदुखी ठरला आहे. भारत सरकारनेही याकडे लक्ष देत प्रतिबंधात्मक सूचना राज्यांना जारी केल्या आहेत. या नव्या विषाणूच्या प्रकारावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलं आहे.

केवळ एका व्यक्तीच्या फोटोमागे देशातील करोना लसीकरणाचे अपयश दीर्घ काळ लपवता येत नसल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. करोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून देशवासियांना मोठा धोका असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील करोना लसीकरणाच्या कार्यक्रमावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. याबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात, “देशातील नागरिकांना आता करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता अधिक गंभीर होऊन जास्तीत जास्त नागरिकांना करोनाची लस उपलब्ध करुन द्यावी. देशातील करोना लसीकरणाची स्थिती वाईट असून ती एका व्यक्तीच्या फोटोमागे दीर्घ काळापर्यंत लपवता येणार नाही.”

गेल्या आठवड्यात दर दिवशी ६८ लाख लोकांचं लसीकरण झालं असून हे खूप संथ गतीनं होतंय असं राहुल गांधींनी सांगितलं. रोज अडीच कोटी लोकांचं लसीकरण होणं अत्यावश्यक असल्याचंही ते म्हणाले.