मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने आज (१ नोव्हेंबर) दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र, या मोर्चादरम्यान दिल्लीतील व्यापाऱ्यांची सर्व दुकाने भाजपाने दडपशाही करून बंद केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी भाजपावर केला आहे.

त्यामुळे दिल्लीतील व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि भाजपामध्ये राजकारण तापलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या महामोर्चाचं नेतृत्व करत असताना राहुल गांधींनी एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधींनी म्हटलं की, “भाजपाने दडपशाही करून सर्व दुकाने बंद पाडली आहेत, ज्यामुळे आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांना कोणतीही वस्तू खरेदी करणं अशक्य झालं आहे. व्यापाऱ्यांचं नुकसान विरोधी पक्ष नव्हे तर भाजपाच करत आहे”, अशी टीका राहुल गांधींनी केली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“दिल्लीतील महारॅलीसाठी आल्यानंतर सर्वांनी काहीतरी वस्तूंची खरेदी करावी असं आवाहन आम्ही सर्वांना केलं होतं. मात्र, कॅनॉट प्लेसवर पोहोचल्यावर महारॅलीत सहभागी होण्यासाठी आलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना समजलं की, भाजपाने दडपशाही करून सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान कोण करत आहे हे तुम्हाला कळलं असेल”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

जे.पी.नड्डा राहुल गांधींवर का भडकले?

इंडिया आघाडीच्या महारॅलीवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींवर महारॅलीवरून हल्लाबोल केला. जे.पी.नड्डा यांनी म्हटलं की, “आज रामलीला मैदानावर जे काही घडत आहे, तो लोकशाहीचा आदर करण्याचा प्रकार नसून लोकशाहीच्या नावाखाली देशाला अराजकतेच्या खाईत लोटण्याचा एक कट आहे. ज्यांना जनतेने वारंवार नाकारलं आहे आणि पराभूत केलंय, अशा लोकांकडून रचलेलं हे एक नाटक आहे. हे वास्तव जनतेलाही माहिती आहे”, अशी टीका जे.पी.नड्डा यांनी केली.

“राहुल गांधी यांच्या राजकारणाच्या स्वरूपाचा पहिला टप्पा म्हणजे खोट्या गोष्टी आणि अफवा पसरवणं, दुसरं म्हणजे रस्त्यावर अराजकता आणि गोंधळ निर्माण करणं, तिसरं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवणं आणि चौथं म्हणजे परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणं होय”, अशी टीका जे.पी.नड्डा यांनी केली.

“आज राहुल गांधी यांनी काढलेल्या मोर्चामागे काय उद्देश आहे? तर पहिला उद्देश म्हणजे आपल्या शीख बांधवांच्या जखमेवर मीठ चोळणं, दुसरं म्हणजे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला पाडण्यासाठी दिल्लीत दंगली आणि गोंधळ घडवून आणणं, तिसरं म्हणजे सणासुदीच्या काळात दिल्लीतील दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी फिरवणं आणि चौथं म्हणजे देशाची बदनामी करणं. पण राहुल गांधींजी हा भारत काही ‘बनाना रिपब्लिक’ नाहीये.”, असं म्हणत जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींवर टीका केली.