भाजपा हा हिंदू धर्माचा वापर आणि दलाली करणारा पक्ष; राहुल गांधींची टीका

काँग्रेसची विचारसरणी भाजप आणि आरएसएसपेक्षा वेगळी आहे, असंही राहुल गांधी म्हणाले

Rahul-Gandhi-3
(Photo- Indian Express)

भाजपा स्वतःला हिंदुंचा पक्ष म्हणवतात आणि देशभरातील लक्ष्मी आणि दुर्गावर हल्ला करतात. ते देशभरात कुठेही जातात. कुठेतरी ते लक्ष्मीला मारतात, तर कुठेतरी ते दुर्गाला मारतात. भाजपाची लोकं केवळ हिंदू धर्माचा वापर आणि हिंदू धर्माची दलाली करतात, ते हिंदू नाहीत, अशी सडकून टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. भाजपा आणि संघाची लोकं स्वतः हिंदुंचा पक्ष असल्याचा दावा करतात. मात्र, गेल्या १०० ते २०० वर्षात महात्मा गांधी ही एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांनी हिंदू धर्म समजून घेतला आणि तो पाळला. आम्ही केवळ गांधींनी पाळलेला हिंदू धर्म ओळखतो, असंही राहुल गांधी म्हणाले.

जर महात्मा गांधींनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू धर्म समजून घेण्यासाठी दिले तर मग गोडसेने त्यांची हत्या का केली? असा सवालही त्यांनी केला. तसेच हा एक विरोधाभास आहे आणि तुम्हाला याचा विचार करावा लागेल, असंही राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसची विचारसरणी भाजप आणि आरएसएसपेक्षा वेगळी आहे. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी इतर विचारसरणींशी तडजोड करू शकतो पण भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीशी नाही. गांधी/काँग्रेस, गोडसे आणि सावरकरांच्या विचारधारेमध्ये काय फरक आहे, हा आपल्यासमोरचा एक मोठा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.

जेव्हा तुम्ही (महात्मा) गांधींचे फोटो पहाल, तेव्हा तुम्हाला त्यांच्या आजूबाजूला २-३ स्त्रिया दिसतील. तुम्ही आतापर्यंत मोहन भागवत यांचा कोणत्याही महिलेसोबतचा फोटो पाहिला आहे का? असा सवाल करत त्यांची त्यांची संघटना महिलांचं अस्तित्व हिरावून घेते आणि आमची संघटना त्यांना व्यासपीठ देते, असं राहुल गांधी म्हणाले. आतापर्यंत मोदी आणि आरएसएसने देशाच्या कोणत्याही महिलेला पंतप्रधान केले नाही, तर ते केवळ काँग्रेसने केले, असंही राहुल यांनी म्हटलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rahul gandhi slams bjp rss mohan bhagwat over hinduism ideology hrc