Rahul Gandhi slams Congress leaders : भाजपाने बंगालमध्ये मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसमधील आणि इतर पक्षांच्या नेत्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसची (TMC) चेष्टा करणाऱ्या किंवा त्यांच्यावर टीका करणाऱ्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पराभवावर आनंद साजरा करणाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले.
राहुल गांधी म्हणाले की, “विरोधी पक्षांचा हा पराभव म्हणजे भारताची लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपाच्या मोहिमेतील एक ‘मोठे पाऊल’ आहे. काँग्रेसमधील काही लोक आणि इतरही तृणमूलच्या पराभवावर आनंद साजरा करत आहेत. त्यांनी हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे की, आसाम आणि बंगालमधील जनादेशाची चोरी हे भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपाच्या मोहिमेतील पुढचे पाऊल आहे. क्षुद्र राजकारण बाजूला ठेवा. ही लढाई एका पक्षाची किंवा दुसऱ्याची नाही, तर ही भारतासाठीची लढाई आहे.”
गेल्या २४ तासांत राहुल गांधी यांनी दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांची पाठराखण केली आहे. सोमवारीही त्यांनी म्हटले होते की, “आम्ही ममताजींच्या मताशी सहमत आहोत. बंगालमध्ये १०० हून अधिक जागा चोरल्या गेल्या आहेत.
प्रियंका चतुर्वेदी यांचीही टीका
“शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही या प्रकाराला “लाजीरवाणे” म्हटले आहे. त्यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, “इंडिया (INDIA) आघाडीमधील अंतर्गत घटक पक्षांकडूनच TMC आणि DMK च्या अपयशावर ज्या प्रकारे आनंद व्यक्त केला जात आहे, ते पाहणे क्लेशदायक आहे. अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव यांचा पराभव झाला आणि आप (AAP) मध्ये फूट पडली, तेव्हाही अशीच शेखी मिरवताना काही लोक दिसले होते. आता आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ते अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत आहेत. हीच फूट मतदार नाकारतात आणि भाजप याचाच फायदा घेते.”
२०२४ च्या निवडणुकीत सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच विरोधकांना मोठी मजल मारता आली, याची आठवण करून देत त्या म्हणाल्या, “कृपया मागे व्हा आणि ‘इंडिया’ आघाडी स्थापन करण्यामागचा मूळ उद्देश लक्षात ठेवा.” दुसरीकडे, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी वेगळी भूमिका मांडली. ते म्हणाले की, “ममता बॅनर्जी यांच्या पाठिंब्यामुळेच भाजपाने बंगालमध्ये प्रवेश केला. त्यांनीच भाजपासाठी रेड कार्पेट अंथरले आणि मेजवान्या दिल्या, आता त्याचे परिणाम तृणमूल भोगत आहे. बंगालमध्ये भगवी लाट उसळली आहे. लोकांना बदल हवा होता, पण तृणमूल पक्ष अशा प्रकारे गायब होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती.” बंगाल आता द्विध्रुवीय राज्याचे स्वरूप घेत असून भाजपा आणि तृणमूल हे दोघेही ध्रुवीकरणाचा फायदा घेत होते, मात्र त्यांच्याच धूर्तपणामुळे त्यांचा तोटा झाला, असेही चौधरी म्हणाले.
