करोना मृतांच्या संख्येवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसह मोदींवर निशाणा साधला आहे. करोनामुळे झालेले मृत्यू मोदी सरकारने लपवले आहेत. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ‘विज्ञान खोटे बोलत नाही. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत’, असा आरोप राहुल यांनी केला आहे. भारतात करोनामुळे ४७ लाख नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केला होता. मात्र, भारत सरकारने हा अहवाल खोटा असल्याचे म्हणत ४.८ लाख नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

“करोना महामारीमुळे ४७ लाख भारतीयांचा मृत्यू झाला. सरकारने दावा केल्याप्रमाणे ४.८ लाख नाही, ज्या कुटुंबांनी प्रियजन गमावले आहेत त्यांचा आदर करा. त्यांना ४ लाख रुपये भरपाई द्या,” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधींना भाजपाचा टोला

राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, भाजपाने काँग्रेस नेत्यांवर कोविड मृत्यूवर राजकारण केल्याचा आरोप केला आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेचा डेटा आणि काँग्रेसचा “बेटा” (मुलगा) चुकीचा असल्याचा टोला भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी लगावला आहे. भारतात करोनामुळे झालेल्या मृत्यूची गणना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची पद्धत दोषपूर्ण आहे. भारत सरकारचा या अहवालावर आक्षेप असल्याचेही ते म्हणाले

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवाडीवर भारताचा आक्षेप

१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत भारतात ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले आहे. ही आकडेवारी भारत सरकारने जारी केलेल्या आकडेवारीच्या दहापट असून जागतिक मृतांच्या आकडेवारीच्या एक तृतीयांश आहे. जगभरात अधिकृतपणे नोंदवल्या गेलेल्या मृतांची संख्या एकूण अंदाजे १४.९ दशलक्ष आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना मृतांची जी आकडेवारी जाहीर केली होती. त्यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. डेटासाठी वापरलेली प्रणाली आणि केलेले संकलन संशयास्पद आहे, असे म्हणत या अहवालावर भारताने आक्षेप घेतला आहे.