PM Modi Meloni Reel: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी इटलीत पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या भेटीत मोदींनी मेलोनी यांना मेलडी चॉकलेट भेट दिली. या भेटीची रील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण, विरोधकांकडून या रीलवर जोरदार टीकाही केली जात आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्याबरोबर केलेली रील हा भारतीय नागरिकांचा अपमान आहे”, अशा शब्दात राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
मोदी आणि मेलोनी यांचा व्हिडीओ व्हायरल
मंगळवारी पंतप्रधान मोदी इटलीमध्ये दाखल झाले असून इटलीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी यांचं स्वागत करत त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मोदींबरोबरचा एक सेल्फी शेअर केला. मेलोनी यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
मेलडी भेट दिल्याचा व्हिडीओ
त्यानंतर मेलोनी यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली यात मोदी, मेलोनी यांना मेलडी चॉकलेट्सचा पुडा गिफ्ट दिल्याचं दिसत आहे. या व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाला. यावरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधींची टीका
“भारतात आर्थिक वादळ येत आहे. तेल, पेट्रोल, डिझेल आणि विमानासाठी लागणाऱ्या इंधनाचे भाव गगनाला भिडतील. खतांची कमतरता भासू लागेल, खतांचे भाव वाढतील, शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसणार आहे. पंतप्रधानांनी सांगितले की सोने खरेदी करु नका, अधिक प्रमाणात वाहन चालवू नका आणि विदेशात जाऊ नका. आणि नंतर विदेशात जाऊन, हजारो, कोट्यवधींच्या विमानातून विदेशात जाऊन तिथं इटलीच्या पंतप्रधान मेलोनींना मेलडी चॉकलेट खाऊ घालत आहेत. हा भारतीय जनतेचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवलेली रील हा भारतीय नागरिकांचा अपमान आहे”, अशा शब्दात राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका केली.
नौटंकी असल्याची टीका
राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या या कृतीला नौटंकी असल्याची टीका देखील सकाळी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केली. “देश आर्थिक संकटात आहे आणि पंतप्रधान मोदी इटलीत चॉकलेट्स वाटत आहेत. हे नेतृत्व नाही, तर नौटंकी आहे”, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.
“देश आर्थिक संकटात आहे आणि आपले पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट्स वाटत आहेत. एकीकडे शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि छोटे व्यावसायिक आक्रोश करत आहेत. मात्र, दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे हासत आहेत आणि रिल्स बनवत आहेत, त्यावर भाजपा टाळ्या वाजवत आहे. हे नेतृत्व नाही, तर नौटंकी आहे”, अशी टीका राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमधून केली आहे.
