Supreme Court NEET UG hearing: “देशातील तरुणांचा विश्वास टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, आपण तरुणांना निराश करता कामा नये”, असे नीट पेपरफुटी प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. तर, सरकारच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी, “खुद्द पंतप्रधान नीट परीक्षेवर लक्ष ठेवून आहेत”, असे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. यावरुन आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नीट पेपरफुटीची देखील मोदींनी देखरेख केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
नीट पेपरफुटी प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. न्यायालयाने केंद्र सरकारला या प्रकरणी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले असून, सुनावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप आणि विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम हे मुद्दे उपस्थित केले. याचिकाकर्त्यांनी परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि फेरपरीक्षेसह विविध मागण्या केल्या. दरम्यान, “स्वतः पंतप्रधान नीट परीक्षेवर लक्ष ठेवून आहेत”, असे केंद्राने यावेळी कोर्टात सांगितले.
राहुल गांधींची टीका
यावरुन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. “मोदींनी नीट पेपरफुटीची देखील स्वतः देखरेख केली होती”, असा आरोपच राहुल गांधींनी केला. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गांधींनी याप्रकरणी पोस्ट केली आहे.
न्यायालयात काय घडलं?
शुक्रवारी न्यायालयाने नीट पेपरफुटी प्रकरणाची सुनावणी करताना, “जे घडले आहे ते तरुणांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. तुम्ही तरुणांना अशा प्रकारे निराश करू शकत नाही,” असे निरीक्षण नोंदवले. परीक्षेत घडलेल्या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली. “जोपर्यंत खरी जबाबदारी निश्चित होत नाही, तोपर्यंत खरी समस्या सुटणार नाही,” असे न्यायालयाने मत नोंदवले. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि आलोक आराधे यांचे खंडपीठ नीट परीक्षेसंबंधित विविध सुधारणात्मक उपाययोजनांची मागणी करणाऱ्या, विविध पक्षांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करत होते. या मागण्यांमध्ये नीट-यूजी परीक्षेचे पूर्णपणे संगणक-आधारित परीक्षेत रूपांतर करण्याच्या सूचनेचा समावेश आहे.
