काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. हिंदुत्वासंदर्भात सलमान खुर्शिद यांनी पुस्तकात केलेल्या विश्लेषणावर भाजपाकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. तसेच, आपण उपनिषदे वाचली असल्याचं सांगून त्यात केलेल्या हिंदुत्वाच्या उल्लेखाविषयी देखील राहुल गांधी यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. वर्ध्यामधील एका कार्यक्रमाला राहुल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते बोलत होते.

हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद यात फरक काय?

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी हिदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. “हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद यात काय फरक आहे? या दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत का? त्या सारख्या गोष्टी असू शकतात का? जर त्या सारख्याच गोष्टी असतील, तर त्यांना एकच नाव का नाहीये? त्यांना दोन भिन्न नावं का आहेत? आपण हिंदुत्ववाद हा शब्द का वापरतो, फक्त हिंदुत्व का नाही म्हणत? कारण नक्कीच त्या दोन भिन्न गोष्टी आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले.

“आपल्याला हे समजून घ्यावं लागेल”

हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद याविषयी भूमिका मांडताना त्यांनी लोकांना देखील आवाहन केलं. “हिंदुत्व आणि हिंदुत्ववादाविषयीच्या या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. त्यांच्या तळापर्यंत जावं लागेल. यातून अशा लोकांचा एक समूह तयार करावा लागेल, ज्यांना हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद यामधला फरक सखोल लक्षात आला असेल. वेगवेगळ्या समस्या, वर्तन किंवा घटनांचा अन्वयार्थ लावताना या फरकाच्या पार्श्वभूमीवर हे लोक विचार मांडतील”, असं राहुल गांधी म्हणाले.

हिंदुत्व म्हणजे मुस्लीम व शिखांना मारहाण करणे – राहुल गांधी

उपनिषदांमध्ये काय सांगितलं आहे?

दरम्यान, आपण उपनिषदे वाचली असल्याचं राहुल गांधी म्हणाले. “हिंदुत्ववाद म्हणजे मुस्लिम किंवा शिखांना मारहाण करणं आहे का? नक्कीच हिंदुत्व म्हणजे ही मारहाण करअे आहे. पण हिंदुत्ववाद म्हणजे अखलाकला जीवे मारणे आहे का? मी उपनिषदे वाचली आहेत. उपनिषदांमध्ये काय म्हटलंय? उपनिषदांमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की तुम्ही एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव घ्यावा”, असं राहुल गांधी म्हणाले.