लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एलपीजीच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी गुरुवारी दुपारच्या सत्रात लोकसभेत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल गांधी यांनी एपस्टीन फाइल्सचा उल्लेख केला. त्यामुळे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी रोखले. त्यावरून पुन्हा प्रचंड गोंधळ झाला.
एपस्टीन फाइल्समध्ये केंद्रीय मंत्री अडकले असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधी यांनी एलपीजी तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केल्याने, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी बोलणार होते, ते सभागृहात आले होते. त्यांचे नाव एपस्टीन फाइल्समध्ये असल्याने राहुल गांधींनी त्यांच्या समोर एपस्टीनचा उल्लेख केला. हा उल्लेख होताच लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी राहुल गांधीना बोलण्यापासून रोखले. “नोटीस वेगळ्या विषयावर आणि बोलणे भलत्याच विषयावर हे चालणार नाही. नियमानुसार कामकाज चालेल,” असे ठणकावून बिर्ला यांनी राहुल गांधींनी बोलण्यापासून रोखले. यानंतर राहुल गांधी सभागृहातून निघून गेले. त्यांना बोलू न दिल्याने काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. या गदारोळात सभागृह संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तहकूब केले केले.
या संदर्भात राहुल गांधींनी लोकसभाध्यक्ष बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. हा मुद्दा लोकसभेत मांडताना गदारोळ झाला. ही नोटीस दिल्यामुळे राहुल गांधींना बोलण्याची परवानगी दिली गेली. केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांना उत्तर देण्यासाठी तातडीने तयारी करावी लागली. पण राहुल गांधींनी नियम पाळले नाहीत. एपस्टीनवर ते बोलले, हे चुकीचे होते, असा संताप केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत व्यक्त केला.
संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, एलपीजी, गॅस आणि तेलाच्या सध्याच्या परिस्थितीवर वक्तव्य करण्यासाठी त्यांनी लोकसभेत बोलण्याची परवानगी मागितली होती. सदस्याला बोलण्याची संधी दिली जाते. मात्र आता नवी पद्धत सुरू झाली आहे की आधी मंत्री ठरवतील, मग मी बोलेन आणि त्यानंतर मंत्री उत्तर देतील, अशी टोलेबाजी राहुल गांधी यांनी केली.
देशातील ऊर्जा सुरक्षेबाबत गंभीर आव्हान उभे राहत असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, गॅसचा प्रश्न निर्माण होणार आहे, पेट्रोलचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि एकूणच इंधनाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, “जागतिक स्तरावर सुरू असलेला संघर्ष केवळ तेलपुरवठ्यापुरता मर्यादित नसून तो सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील मोठ्या बदलाचा भाग आहे. जग अस्थिर झाले असून अशा वेळी देशाने आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. सरकारने संभाव्य परिस्थितींचा सखोल विचार करून भारतीय नागरिकांना नुकसान होणार नाही यासाठी तयारी करावी.”
दुबेंचा आक्षेप
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींच्या चहा पिण्यावर आक्षेप घेतला. राहुल गांधी संसदेच्या आवारात आंदोलन करत चहा पीत होते, त्यांचे हे वर्तन अयोग्य आहे. राहुल गांधींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी दुबेंनी केली.
देशाच्या नेतृत्वात एक मूलभूत समस्या आहे. मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून पूर्णपणे कार्य करू शकत नाहीत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारने ऊर्जा सुरक्षेबाबतचे निर्णय स्वतंत्रपणे घेण्याची गरज आहे. सरकारने हा इशारा ऐकला नाही, तर भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
