Rahul Gandhi Youth Protest Support : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सोशल मीडियाद्वारे सरकारवर कडाडून टीका करत, आपण कोणत्याही परिस्थितीत संविधानाचे रक्षण करण्यासाठी मागे हटणार नाही, असा इशारा दिला आहे.

‘गेल्या १० वर्षांपासून आरपारची लढाई’

राहुल गांधी म्हणाले, “मी गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून नरेंद्र मोदी आणि आरएसएस विरोधात लढत आहे. मी त्यांना खूप जवळून ओळखतो. प्रतिस्पर्ध्याला जसे आतून-बाहेरून ओळखावे, तसेच मी त्यांना ओळखतो. भीती आणि पळपुटेपणा हाच या लोकांचा मुख्य स्वभाव आहे.”

पाच जणांचा ‘व्हिलन’ म्हणून उल्लेख

आपल्या वक्तव्यात राहुल गांधी यांनी थेट पाच मोठ्या नावांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार आणि अजित डोवाल हे या कथेचे मुख्य ‘व्हिलन’ (खलनायक) आहेत.

‘मोदीजी, हवी तेवढी पोलीस फौज बोलवा, आम्हाला अटक करा’

सरकारकडून आंदोलकांवर होत असलेल्या कारवाईवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी थेट आव्हान दिले. ते म्हणाले, “मोदीजी, तुम्हाला जे करायचे आहे ते करा. १० हजार, २० हजार किंवा ५० हजार कितीही पोलीस बोलवायचे असतील तर बोलवा. सर्व नेत्यांना अटक करा, तरुणांना अटक करा, आम्हा सर्वांना तुरुंगात टाका. आम्ही तुम्हाला चोहोबाजूंनी घेरले आहे आणि आम्ही आता अजिबात मागे हटणार नाही. हे माझे शब्द लक्षात ठेवा, आम्हाला जी माहिती हवी होती, ती आमच्याकडे आधीच आली आहे.”

संविधान आणि देशाच्या आवाजाचे रक्षण करणार

राहुल गांधी यांनी देशवासीयांना आणि तरुणांना धीर देत म्हटलं की, “आम्ही भारताच्या संविधानाचे रक्षण करू आणि देशातील जनतेचा आवाज बुलंद ठेवू. गेल्या १० ते १५ वर्षांत भारताचे जे नुकसान केले गेले आहे, ते पुन्हा कधीही होऊ दिले जाणार नाही. देशातील तरुणांनो, मला तुमचा अभिमान आहे. तुमचे आंदोलन सुरू ठेवा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. संविधान ओरबाडणाऱ्या या राजवटीचा पराभव आम्ही निश्चित करू.”