मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरसह आणखी काही निर्णय मनमानीपणे घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर देशभरात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मागील काही दिवसांपासून इंडिया आघाडी, कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे.

मतचोरीच्या आरोपांविरोधात काँग्रेस आणि इंडिया आघाडीसह आणखी काही विरोधी पक्षांनी एकत्र येत आज (१२ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आहे. या मोर्चाच्या आधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘ज्ञानेश कुमारांनी गुन्हा केलाय, हे त्यांनी मान्य करावं, आम्ही माफ करू’, असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला.

दरम्यान, आता इंडिया आघाडीच्या आंदोलनाची पुढील रणनीती काय असेल? याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी एक महत्वाचं भाष्य केलं आहे. ‘हे शिवतांडव आहे. यात कोणीही सहभागी होऊ शकतं. कोणत्याही नियोजनाची गरज नाही’, असं राहुल गांधींनी दिल्लीतील निदर्शनांबाबत म्हटलं आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राहुल गांधी यांना आंदोलनाबाबत प्रश्न विचारला. आंदोलनाची पुढील रणनीती काय आहे? यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “माझी बहीण मला म्हणते की आपण काहीतरी योजना आखली पाहिजे. मात्र, मी तिला सांगितलं की हे तांडव आहे. हे शिवतांडव आहे. यामध्ये कोणतंही नियोजन नसतं. आज आम्ही सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढत आहोत. उद्या पुन्हा काहीतरी वेगळं असेल. कोणत्याही नियोजनाची गरज नाही. हे शिवतांडव आहे. ही भगवान शंकराची वरात आहे. यात कोणीही सहभागी होऊ शकतो, आम्ही कोणालाही रोखणार नाहीत”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

“ज्ञानेश कुमार तुम्ही गुन्हा केलाय” : राहुल गांधी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी विविध विषयांवर महत्वाचं भाष्य केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न राहुल गांधींना आज पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, “ज्ञानेश कुमारांचे मला मेसेज येतात. ते ही पत्रकार परिषदही पाहत आहेत.” राहुल गांधींच्या या दाव्यावर प्रतिप्रश्न विचारण्यात आला की, त्यांच्या मेसेजला काय उत्तर दिलं? त्यावर ते म्हणाले की, “माफीचा साक्षीदार व्हा. तुम्ही गुन्हा केला आहे आणि खरं सांगायचं तर, तुम्ही मुख्य गुन्हेगार नाही आहात. तुमच्याकडून चूक झाली आहे. तुम्ही चूक केली आहे. पण त्या चुकीमागे तुमचा हात नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.

राजधानी दिल्ली तुरुंगात का?

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १२ ऑक्टोबर रोजी नियोजित काँग्रेसच्या मोर्चापूर्वी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. यादरम्यान ते म्हणाले, “लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात आहे. ट्रेन आणि बसेस थांबवल्या जात आहेत. दिल्लीला एका किल्ल्यात बदलण्यात आलं आहे. भारताची राजधानी असलेली दिल्ली तुरुंगात का आहे?”