पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवशी, शुक्रवारी दैनंदिन लसीकरणाचा नवा विक्रम करण्यात आला होता. संपूर्ण देशभरात दोन कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले. देशात शुक्रवारी रात्री ११ वाजेपर्यंत दोन कोटी ३७ लाख ७३ हजार जणांचं लसीकरण करण्यात आलं होतं. लसीकरणाचा विक्रम केल्याच्या दोन दिवसांतच लसीकरण कमी झाल्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. “इव्हेंट संपलाय” असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

इव्हेंट संपल्याची टीका करताना राहुल गांधी यांनी लसीकरणाचा एक ग्राफ शेअर केलाय. यामध्ये CoWin वेबसाईटच्या आकडेवारीनुसार गेल्या १० दिवसातील लसीकरणाची आकडेवारी आहे. ९ ते १६ सप्टेबरपर्यंत सरासरी सारखा असणारा ग्राफ १७ तारखेला विक्रमी लसीकरणानंतर चांगलाच वर गेलाय. त्यानंतर १८ तारखेला पुन्हा खाली घसरलाय. पंतप्रधानांच्या वाढदिवसासाठी करण्यात आलेला इव्हेंट आता संपलाय, असं राहुल गांधींनी म्हटलंय.

दरम्यान, शुक्रवारी विक्रमी लसीकरणानंतर आपल्या देशाला लसीकरणाचा हाच वेग गरजेचा आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.

लसीकरणाचा विक्रम पाहून ताप चढल्याची मोदींची टीका..

“माझ्या ७१ व्या वाढदिवशी देशात एकाच दिवसात २.५ कोटी लोकांना करोना प्रतिबंधक लसमात्रा  देण्यात आल्या हा भावोत्कट क्षण असून तो सदैव स्मरणात राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हणाले होते. तसेच कुठल्याही पक्षाचे नाव न घेता मोदी यांनी सांगितले, की आपल्या वाढदिवशी २.५ कोटी लसमात्रा देण्याचा विक्रम झाल्याचे ऐकून एका राजकीय पक्षाला ताप चढला. लोक लशीनंतर येणाऱ्या तापाचा विचार करतात पण येथे राजकीय पक्षाला २.५ कोटी लसमात्रा देण्याच्या विक्रमामुळे ताप आला आहे, असं मोदींनी म्हटलं होतं. या प्रकारचे यश मिळवण्यासाठी कुशल मनुष्यबळ लागते, इच्छाशक्ती लागते जी  भारतातील लोकांकडे आहे. वाढदिवस येतात व जातात, पण कालचा वाढदिवस सदैव स्मरणात राहील कारण त्यादिवशी २.५ कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. आपल्यासाठी हा अविस्मरणीय प्रसंग होता,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.