नवी दिल्ली : लोकशाही उद्ध्वस्त करणार्यांची सुटका होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या गळ्याभोवती फास आवळत चालला आहे, असा थेट इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी दिला.
आमची आंदोलने वेगवेगळी नाहीत, एकच आंदोलन सुरू आहे आणि देशात लोकशाही पुनर्स्थापित करणे हेच या आंदोलनाचे उद्दिष्ट आहे. लोकशाही आणि निवडणूक व्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आली असून, देशात खरी लोकशाही आणण्यासाठी आम्ही लढत आहोत, असे स्पष्ट करत, राहुल गांधी यांनी मंगळवारी, ‘इंडिया’ आघाडीच्या तसेच आंदोलनांच्या ऐक्यावर भर दिला.
दिल्लीत सोमवारी झालेल्या ‘मार्च फॉर डेमॉक्रसी’च्या प्रचंड यशानंतर, राहुल गांधी यांच्या निवासस्थानी मंगळवारी ‘इंडिया’ आघाडीतील नेते- खासदार, विद्यार्थी संघटना आणि नागरी समाजातील प्रतिनिधी यांच्यासाठी चहापानाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधीही उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये ज्ञानेश कुमार व केंद्र सरकारविरोधातील रणनीती निश्चित करण्यात आली. मतदार याद्यांची विशेष फेरतपासणी मोहीम (एसआयआर) व ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेतील १४ त्रुटी सुधारण्यात आल्या असून ती सर्वोच्च न्यायालयाने नोंदवून घेतली आहे. याचिकेवर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे.
आंदोलनाची रणनीती गुलदस्त्यात
सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या पुढील सुनावणीबरोबरच रस्त्यावर उतरून आंदोलनही सुरू ठेवण्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले. मात्र, पुढील आंदोलनाची नेमकी दिशा, ठिकाणे किंवा कार्यक्रम जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. ‘आमच्या योजनेचा तपशील आम्ही सांगू शकत नाही. मात्र हे आंदोलन सुरूच राहील एवढेच सांगू शकतो.
ज्या पद्धतीने आम्ही लोकांना एकत्र केले, त्याच पद्धतीने पुढेही आंदोलन सुरू ठेवू,’ असे राहुल गांधी यांनी सांगितले. न्यायव्यवस्थेबद्दल आदर व्यक्त करताना राहुल गांधींनी, सरन्यायाधीश घटनात्मक भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त केली. केंद्र सरकारने जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यावर कायमची बंदी घातली आहे. या निर्णयाविरोधात आम्ही लढू, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. पुढील आंदोलनाची दिशा येत्या काही दिवसांत जाहीर केली जाईल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
