राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मीरमध्ये समारोप झाला. यानिमित्ताने काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान आलेल्या विविध अनुभवाचेही कथन केले. दरम्यान, यावेळी त्यांनी यात्रेदरम्यान झालेल्या गुडघेदुखीबाबतचा एक प्रसंगही सांगितला.
हेही वाचा – “माझा पांढरा टीशर्ट लाल करण्याची संधी मी..” राहुल गांधी यांचं रोखठोक वक्तव्य
काय म्हणाले राहुल गांधी?
मी कन्याकुमारीपासून चालायला सुरूवात केली. देशभर आम्ही पायी चाललो. भारत जोडो यात्रा सुरू होण्यापूर्वी अनेक वर्ष मी दररोज आठ ते दहा किलोमीटर चालत होते. त्यामुळे कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालताना जास्त त्रास होणार नाही, असं वाटलं. त्यावेळी थोडा अहंकारही आला होता. मात्र, शाळेत फुटबॉल खेळताना माझ्या गुडघ्याला झालेली जखम मी विसरलो होतो. भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर पाच दिवसांनी मला पुन्हा गुडघ्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर ३ हजार ५०० किमीची यात्रा पूर्ण करू शकेल की नाही, याबाबत मनात शंका निर्माण झाली. मात्र, तरीही मी यात्रा पूर्ण केली. अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
हेही वाचा – भारत जोडो समारोप यात्रेत प्रियांका गांधी यांचे जोरदार भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”
पुढे बोलताना त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्याचा प्रसंगही सांगितला. ते म्हणाले, गुडघ्याचा त्रास सुरू असताना एक दिवस मला एक छोटी मुलगी भेटायला आली. तिने मला एक चिठ्ठी दिली. मी काही वेळाने ती चिठ्ठी वाचली. तिने लिहिलं होतं, मला माहिती आहे, तुमला गुडघ्याचा त्रास होतो आहे. जेव्हा तुम्ही त्या पायावर जोर देता, तेव्हा तो त्रास तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. मला वाईट वाटते आहे, की मी तुमच्याबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ शकत नाही, कारण माझे आईवडील मला परवानगी नाही देणार नाहीत. पण मी मनाने तुमच्या बरोबर असेन. कारण मला माहिती आहे, की तुम्ही स्वत:साठी नाही तर माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या असंख्य मुलींच्या भविष्यासाठी चालत आहात, आणि तिची ही चिठ्ठी वाचल्यानंतर मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी कधीची गुडघ्याचा विचार केला नाही, असेही त्यांनी सांगितले.