भाजप आणि आरएसएसने सुरू केलेली द्वेषाचे राजकारण संपवायचे आहे असे म्हणत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी म्हणजे गंगा-यमुनेचा संगम असून यातून विकासाची सरस्वती बाहेर येईल असे राहुल गांधी यांनी म्हटले.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज रथ यात्रा करुन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. काँग्रेस आणि समाजवादीने आघाडी केल्यानंतर प्रथमच राहुल आणि अखिलेश एकत्र येणार आले आणि त्यांनी संयुक्त परिषद घेतली.

उत्तर प्रदेशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. समाजवादी पक्ष एकूण २९८ जागा लढवणार आहे तर काँग्रेस १०५ जागा लढवणार आहे. ११ फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. राहुल गांधी आणि अखिलेश हे दोघे मिळून अनेक ठिकाणी प्रचार करणार असल्याचे म्हटले जात आहे.

राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी मिळून पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. समाजवादी आणि काँग्रेसची युती ही विचारांवर आहे असे राहुल यांनी म्हटले. आम्हाला संधी मिळावी म्हणून नव्हे तर आमचे विचार समान आहेत म्हणून आम्ही ही युती केल्याचे राहुल यांनी म्हटले. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र मिळून उत्तर प्रदेशच्या प्रगतीसाठी झटतील असे ते म्हणाले. जर हाथाला सायकल आणि सायकलला हाथाची साथ असेल तर विकासाची गती कशी राहील? असे अखिलेश यादव यांनी म्हटले. काँग्रेस आणि समाजवादी ही प्रगती आणि समृद्धतेची दोन चाके आहेत असे अखिलेश यांनी म्हटले. सोनिया गांधी आणि मुलायम सिंह यादव हे प्रचारासाठी येणार का असे विचारला असता राहुल यांनी हसत उत्तर दिले. मी तुमच्यासोबत माझी प्रचाराची रणनीती काय आहे याबाबत मी तुम्हाला सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले.

युपी को ये साथ पसंद है

‘बेबी को बेस पसंद है’ या गाण्याशी साधर्म्य असणारे युपी को ये साथ पसंद है असे घोषवाक्य प्रचारासाठी निश्चित करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे दोघेही तरुण नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक जिंकणार असा विश्वास दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. यामुळेच युपी को साथ पसंद है असे म्हटले जात आहे. दरम्यान, त्यांच्या या प्रचाराच्या घोषवाक्याची भाजपने खिल्ली उडवली आहे. एक भ्रष्ट पक्ष आहे तर दुसरा गुंडागर्दी करणारा तेव्हा नेमकी कोणती साथ पसंत पडली असा सवाल भाजप नेते करत आहेत.