PM Modi residence protest: दिल्लीत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांबरोबर सरकार आणि गृहमंत्र्यांनी केलेल्या कृत्याबाबत विद्यार्थ्यांची माफी मागा, असा सल्ला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला. पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ केलेल्या ठिय्या आंदोलनाचा उद्देश स्पष्ट करत राहुल गांधींनी नीट पेपरफुटीसह दिल्ली आंदोलनावरील कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेवर लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेची मागणी केली. ठिय्या आंदोलनानंतर काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, यानंतर राहुल गांधींनी मंगळवारी रात्री छत्रसाल स्टेडियम डिटेंशन सेंटरमध्ये असतानाच एक व्हिडीओ प्रसिद्ध केला.

पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ ठिय्या आंदोलन का केले?

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी या विषयी भेटून चर्चा केल्याचे राहुल गांधींनी सांगितले. “मी आज सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना विद्यार्थ्यांबरोबर काय घडलं यावर चर्चा करण्याची परवानगी मागितली, पण, अध्यक्षांनी मला सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल असं उत्तर दिले”, असे राहुल गांधी म्हणाले. “काही वेळानंतर आमच्या असं लक्षात आलं की सरकारला या विषयी चर्चा करण्यात काही रस नाही, त्यानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत, जो देशातील मूळ मुद्दा आहे आणि विद्यार्थ्यांना जी वागणूक दिली आहे, या गोष्टी देशाच्या नजरेसमोर आणाव्यात”, हा ठिय्या आंदोलनाचा उद्देश होता असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी शिक्षण व्यवस्थेवर उपस्थित केले महत्वाचे प्रश्न

राहुल गांधींनी व्हिडीओच्या माध्यमातून महत्वाच्या प्रश्नावरही भाष्य केले. “देशातील शिक्षण व्यवस्था का ढासळत आहे? पेपरफुटी का होत आहे? देशात शिक्षण एवढं महाग का आहे? मुलांना शिक्षण देण्यासाठी लोकांवर आर्थिक दडपण का वाढत आहे? हे काही महत्वाचे प्रश्न आहेत, आणि ते विचारणं अजिबात चुकीचे नाही”, असे राहुल गांधींनी म्हटले.

लोकसभा, राज्यसभेत चर्चेची मागणी

“धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाहांचा राजीनामा, विद्यार्थ्यांना मारहाण केलीय त्यांच्यावर कारवाई केली जावी आणि विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे माघारी घ्यावेत”, अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.

“देशातील या महत्वाच्या विषयावर बुधवारी लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा व्हावी अशी सर्व विरोधकांची मागणी आहे. तसेच, दिल्लीत विद्यार्थ्यांबरोबर जो प्रकार घडला, तुमच्या सरकारने, गृहमंत्र्यांनी जे केलं त्याबाबत तुम्ही विद्यार्थ्यांची माफी मागा असा सल्ला विरोधी पक्षनेता म्हणून देतो”, असे राहुल गांधी म्हणाले. शिवाय लवकरात लवकर परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासाठी पावले उचला, असेही राहुल गांधी म्हणाले. विद्यार्थ्यांच्या मुद्यांवर रस्त्यावर उतरलेल्या सर्वांचे राहुल गांधींनी व्हिडीओतून आभार मानले आहेत.