Rahul Gandhi Vote Chori 1 November March : लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो दिल्ली रामलीला मार्च’मध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे. ‘व्होट चोरी’ रोखण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं. या मोर्चाला पोलिसांच्या कारवाईची किंवा लाठ्यांची भीती बाळगू नका, असं आवाहनही राहुल गांधी यांनी केलं.

राहुल गांधी यांनी गुरुवारी (२९ ऑक्टोबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडीओ संदेश प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना, मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं. हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘हा भारताच्या आत्म्याचा मोर्चा’

“चलो दिल्ली रामलीला मार्च हा लोकशाही वाचवण्यासाठी, मतचोरी रोखण्यासाठी आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठीचा मोर्चा आहे. हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा मोर्चा नाही, तर भारताच्या आत्म्याचा मोर्चा आहे,” असं राहुल गांधी यांनी व्हिडीओ संदेशात म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल नाराजी असलेल्या, तसेच लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करू इच्छिणाऱ्या सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं.

‘पोलिसांची किंवा लाठ्यांची चिंता करू नका’

मोर्चात सहभागी होण्यास नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईची भीती बाळगू नये, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. “पोलिसांची किंवा लाठ्यांची चिंता करू नका. भाजपामध्ये अशा प्रकारची कृती करण्याचं धाडस नसेल. संविधान आणि देशाच्या रक्षणासाठी आपल्याला एकत्र चालायचं आहे, घाबरण्याची गरज नाही. हा देशाचा मोर्चा आहे आणि तुमचाही मोर्चा आहे,” असं ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर, विचारांवर किंवा मतांवर हल्ला होत असल्याचं वाटत असेल, तर त्यांनीही या मोर्चात सहभागी व्हावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं. विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय विचारसरणीशी संबंधित असलं तरी लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र यावं, असं त्यांनी नमूद केलं. ‘व्होट चोरी’च्या आरोपांवरून विरोधकांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे.