नवी दिल्ली: माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व केंद्र सरकार यांच्यातील द्वंद्वयुद्ध दुसऱ्या दिवशी, मंगळवारीही सुरू होते. त्यावरून लोकसभेत शाब्दिक चकमकी, घोषणाबाजी आणि कागदपत्रे फेकण्याचे प्रकार घडले. त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब केले गेले.

जनरल नरवणेंचा संदर्भ देत चिनी घुसखोरीवर बोलण्याचा आग्रह न सोडल्याने राहुल गांधींचे भाषण अर्ध्यावरच थांबवले गेले व पीठासीन अधिकारी कृष्णाप्रसाद तेन्नेटी यांनी इतर सदस्यांची भाषणासाठी नावे पुकारली. या कृतीमुळे संतापलेल्या विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घालून कागदाचे कपटे लोकसभाध्यक्षांच्या खुर्चीकडे फिरकावले. या प्रकरणी ८ विरोधी सदस्यांना उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित केले गेले.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये बोलताना राहुल गांधींनी सोमवारी जनरल नरवणेंच्या पुस्तकाचा संदर्भ देत चिनी घुसखोरीचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्याआधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लक्ष्य केले होते. लोकसभेत मंगळवारी चर्चा सुरू झाली तेव्हा राहुल गांधींनी पुस्तकातील संक्षिप्त अंश प्रकाशित झालेल्या मासिकाची पाने पटलावर ठेवून मजकूर प्रमाणित केल्याचे स्पष्ट केले. याच मुद्द्यावरून सोमवारी राजनाथ व अमित शहा यांनी राहुल गांधींना पुस्तकाच्या आधारे बोलण्यास विरोध केला होता.

मजकूर प्रमाणित केल्यानंतरही राहुल गांधींना चिनी घुसखोरीवर बोलण्यास पीठासीन अधिकारी तेन्नेटी यांनी मनाई केली. मात्र, राहुल गांधींनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत पुस्तकातील उतारा वाचून दाखवण्याचा अट्टहास धरला. सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत गदारोळ सुरू केला, तर काँग्रेस सदस्यांनी निषेध नोंदवला. या गोंधळामुळे सभागृह दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब झाले.

राहुल गांधी यांनी भाषणाच्या ‘परवानगी’ या शब्दावर आक्षेप घेतला. ‘मी विरोधी पक्षनेता आहे. मला कोणीही परवानगी देत नाही’, असे त्यांनी सांगितले. यावर केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर देत, ‘इथे प्रत्येकजण अध्यक्षांच्या परवानगीनेच बोलतो,’ असे स्पष्ट केले. लोकसभाध्यक्षांनी सोमवारी नरवणेंच्या पुस्तकासंदर्भात निर्णय दिला असल्याने त्या विषयाचा पुन्हा उल्लेख करता येणार नसल्याचेही रिजिजू यांनी सांगितले. मात्र, राहुल गांधी यांनी, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याशी संबंध असल्याचे सांगत पूर्व लडाखमध्ये चीनने आपल्या जवानाची हत्या केल्याची टिप्पणी केली. राहुल गांधी चीनचा मुद्दा सोडण्यास तयार नसल्याचे पाहून त्यांना तेन्नटी यांनी बोलण्यापासून रोखले. पीठासीन अधिकारी तेन्नटी यांनी इतर विरोधी सदस्यांची बोलण्यासाठी नावे पुकारली. मात्र, समाजवादी पक्ष व तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी एकजुटीचे प्रतीक म्हणून बोलण्यास नकार दिला.

विरोधकांची एकजूट राहुल गांधींना भाषण पूर्ण करून दिल्यामुळे संतापलेले काँग्रेस तसेच, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी विरोधी सदस्यांनी लोकसभाध्यक्षांच्या आसनासमोर येऊन प्रचंड घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या काही खासदारांनी कागदपत्रे फाडून अध्यक्षांच्या आसनाकडे फेकली. त्यामुळे सभागृहातील वातावरण तणावपूर्ण झाले. दुपारी ३ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी घोषणाबाजी, कागद फाडणे आणि अध्यक्षांच्या अधिकाराचा अवमान केल्याच्या आरोपाखाली आठ विरोधी खासदारांचे निलंबन केले. त्यामध्ये अमरिंदर सिंग राजा वारिंग, गुरजीत सिंग औजला, हिबी इडन, डीन कुरियाकोस, प्रशांत पाडोळे, किरण कुमार रेड्डी आणि माणिकम टागोर हे काँग्रेसचे सात खासदार व माकपचे खासदार एस. व्यंकटेशन यांचा समावेश आहे.

कोट इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलू दिले नाही. केंद्र सरकार मुद्दाम आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. –राहुल गांधी, विरोधी पक्षनेते

सकाळच्या सत्रातही तहकुबी

राज्यसभेत काँग्रेससह विरोधी सदस्यांनी भारत-अमेरिका करारावर चर्चा करण्याची मागणी करत गोंधळ घातला. शून्य प्रहरात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कराराची माहिती वॉशिंग्टनमधून मिळत असल्याचा आरोप केला. तसेच, भारतात येणाऱ्या अमेरिकेतील कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क पूर्णपणे काढून टाकण्याच्या केंद्राच्या निर्णयाचा विरोध केला. या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला.