नवी दिल्ली, पीटीआय
जन-महाभियोग हे भारतीयांच्या मतांच्या चोरीमध्ये सामील असणार्यांच्या विरोधातील एक राजकीय अस्र आहे, असे सांगतानाच मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांच्यावर न्यायालयात राष्ट्रद्रोहाचा खटला भरण्याची आवश्यकता आहे, असे उद्गार विरोधी पक्षनेते राहुल गांधी काढले. आयोगातील अनियमिततेचे अनेक पुरावे काँग्रेस पक्षाकडे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींना त्याचे उत्तरदायित्व घ्यावेच लागेल. यातून आम्ही त्यांची सुटका होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
‘इंडिया’ आघाडीने आयोजित केलेल्या ‘जनमहाभियोग’ कार्यक्रमात राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, या कार्यक्रमातून विरोधक लोकशाहीची खिल्ली उडवत असल्याची टीका भाजपने केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दिल्लीत झालेल्या या अभिरुप महाभियोगास इंडिया आघाडीचे खासदार तसेच नागरी संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार या ‘सुनावणी’च्या अध्यक्षस्थानी होत्या.
ज्ञानेश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशांनुसार काम करत असल्याचा आरोप करीत खरगे यांनी महाभियोगाचा प्रस्ताव मांडला. राहुल गांधी यांनी या प्रस्तावास समर्थन दिले. ते म्हणाले, विरोधकांना या बागेमध्ये महाभियोगाची कारवाई चालवावी लागली. कारण आमच्याकडे अन्य पर्यायच नव्हता. देशातील एकूणएक संस्थांची दारे आमच्यासाठी बंद करण्यात आली आहेत. विरोधी पक्षाच्या एका नेत्याच्या निवासस्थानी असे २५० खासदार, नागरी समाजाचे प्रतिनिधी आणि पत्रकार बसावेत हा खरे तर विचित्र प्रकार आहे. वस्तुत: हे एक राजकीय अस्त्र आहे. ज्या ज्या व्यक्तीने भारतीय लोकांची मते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या प्रत्येकाविरोधात हे अस्र आहे. भारतातील तमाम ‘ज्ञानेश कुमारां’ना येथून हा संदेश देण्यात येत आहे, की तुम्ही ज्या संस्थांचे संरक्षण करण्याची शपथ घेतलेली आहे, त्या संस्थांमागेच लपत आहात. पण एक ना एक दिवस तुम्हाला या लोकांच्या प्रतिनिधींचा सामना करावाच लागेल.
भाजपकडून खिल्ली
राहुल गांधी यांचे नेतृत्त्व पुढे आणण्यासाठी मोर्चे काढा किंवा आंदोलन करा काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी या जनमहाभियोगाची खिल्ली उडवली. यावेळी त्यांनी मतदार याद्यांबाबत काँग्रेस अपप्रचार करत असल्याचा आरोप केला. पं. नेहरु यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना डावलून पंतप्रधानपद पटकावले ही देशातील पहिली ‘मतचोरी’ होती, हा दावा पात्रा यांनी यावेळी पुन्हा केला. पाटण्यात पत्रकारांशी बोलताना भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनीही हाच दावा केला. या जनमहाभियोगातून इंडिया आघाडीचे नेते संसदेची आणि नागरिकांची खिल्ली उडवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
२०२४ची निवडणूक बेकायदेशीर आहे. १३.३ कोटी मते वगळून कोणी ही निवडणूक कायदेशीर आहे असे म्हणू शकत नाही. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते
राहुल गांधी बेजबाबदार नेते आहेत. मतदानप्रक्रियेत घोळ असल्याचे वाटत असेल, तर काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा द्यावा. – रविशंकर प्रसाद, भाजप नेते
