काँग्रेसची भारत जोडो यात्रा तीन दिवसांपासून राजस्थानमध्ये आहे. राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो’ यात्रेत व्यस्त आहेत. अशात त्यांचं फुटबॉल प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे. काल रात्री त्यांनी मोरक्को विरुद्ध स्पेन फुटबॉल सामना बघत काही आनंदाचे क्षण घालवले आहेत. सामना बघतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांनी देखील हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.
हेही वाचा – राज्यात ३५ लोकसभा मतदारसंघांत भाजपचे बूथस्तरावर सशक्तीकरण; राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आखणी
राहुल गांधींनी घालवले आनंदाचे क्षण
राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान फुटबॉल विश्वचषक सामन्याचा आनंद लुटला. हा सामना त्यांनी मोठ्या पडद्यावर पाहिला. यावेळी त्यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर नेतेही उपस्थित होते. तसेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘मोदी-मोदी’च्या घोषणा, राहुल गांधींचं प्रत्युत्तर
‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानच्या झालावाडमध्ये असताना भाजपा समर्थकांकडून ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देण्यात आल्या. यावर राहुल गांधींनी फ्लाईंग किस देत प्रत्युत्तर दिलं. यापूर्वी मध्य प्रदेशातील आगर मालवा येथेही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. यावेळीही राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस देत प्रत्युत्तर दिलं होतं.
हेही वाचा – “हातावर हात ठेऊन शांत बसणार नाही”, नोटाबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट म्हणाले…
भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये
दरम्यान, ‘भारत जोडो’ भारत जोडो यात्रा रविवारी सांयकाळी राजस्थानच्या जलवार जिल्ह्यात दाखल झाली. आज या यात्रेचा तिसरा दिवस आहे. ही यात्रा २१ डिसेंबरपर्यंत राजस्थानमध्ये असून यादरम्यान, एकूण सात जिल्हे ५२० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यादरम्यान ९ आणि १७ डिसेंबर असे दोन दिवस ही यात्रा स्थगीत करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारत जोडो यात्रा या ज्या मार्गावरून जाणार आहे. त्यापैकी काँग्रेसची सत्ता असलेलं राजस्थान हे शेवटचं राज्य आहे. त्यामुळे ही यात्रा यशस्वी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.