काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आता उत्तर प्रदेशमध्ये आहे. मंगळवारी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अमेठी बोलत असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील परिस्थितीवर टीका केली. सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघाची तुलना करत असताना राहुल गांधी म्हणाले, “मी वाराणसीला गेलो असता मला तिथे विकास दिसला नाही, मला तिथे उत्तर प्रदेशचे भविष्य दिसले. मद्याच्या नशेत रस्त्याच्या कडेला पडलेले युवक मी पाहिले. बाजाच्या संगीतावर त्यांना झिंगताना मी पाहिले.” यावेळी राहुल गांधी यांनी एका पत्रकाराला त्याच्या मालकाचे नाव विचारले. पण पत्रकाराने उत्तर न दिल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली, त्यानंतर भाषण थांबवत राहुल गांधींनी त्याला मारू नका, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.

मी वाराणसीत गेलो होतो. रात्रीची वेळ होती. तिथे बाजा वाजताना मी पाहिला. बाजाच्या संगीतावर युपीचं भविष्य रस्त्यात नाचताना मी वाराणसीत बघितलं. दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या अयोध्येत नुकतेच राम मंदिराचे उदघाटन झाले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तुम्ही पंतप्रधान मोदी, अदाणी, अंबानी यांना पाहिले असेल. देशातील अनेक अब्जाधीस तिथे जमले होते. पण या सोहळ्यासाठी मागासवर्गीय, आदिवासी किंवा दलित नागरिक कुठेही दिसले नाहीत. कारण या लोकांची तिथे नाही तर रस्त्यावर जागा आहे”, अशीही टीका राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांनी सोमवारी भारत जोडो न्याय यात्रेत बोलत असताना राम मंदिराबाबत हा दावा केला. ते म्हणाले, “अयोध्येत मोठ्या थाटामाटात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. मात्र या सोहळ्याला दलितांना निमंत्रित केले गेले नाही. एवढंच नाही तर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित केले गेले नाही. मात्र श्रीमंतांना पायघड्या घालण्यात आल्या. जे लोक जीएसटी भरतात, त्या युवकांनाही बोलावले गेले नाही.”

राहुल गांधींच्या प्रश्नानंतर पत्रकाराला कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

राहुल गांधी भाषण करत असताना त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेचे वार्तांकन करत असलेल्या एका पत्रकाराला त्याचे नाव विचारले. व्हिडिओग्राफरने स्वतःचे नाव सांगितल्यानंतर त्याला त्याचे मालकाचे नाव राहुल गांधी यांनी विचारले. मात्र पत्रकार मालकाचे नाव सांगण्यास तयार झाला नाही. राहुल गांधी दोन ते तीन वेळा ओरडून ओरडून नाव सांग म्हणून लागल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सदर पत्रकाराला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यावेळी राहुल गांधी यांनी भाषण मध्येच थांबवून त्याला मारू नका, असे कार्यकर्त्यांना बजावत असल्याचे वरील एएनआयच्या व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे.

राहुल गांधींच्या मनात उत्तर प्रदेशबद्दल विष

वाराणसीबद्दल केलेल्या विधानानंतर अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली. त्या म्हणाल्या, “उत्तर प्रदेशबद्दल त्यांच्या मनात किती विष भरलेले आहे. हे यातून दिसून येते. केरळच्या वायनाड मतदारसंघातही राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशबद्दल अशीच विधानं केलेली आहेत. आता यूपीच्या युवकांबद्दल त्यांनी केलेलं विधान संतापजनक आहे. तसेच यूपीच्या युवकांचे नाही तर काँग्रेस पक्षाचे भवितव्य अंधारात दिसत आहे. सोनिया गांधी आपल्या मुलाला चांगले संस्कार देऊ शकत नसतील तर त्यांनी कमीतकमी आमच्या श्रद्धांस्थळांबाबत तरी अश्लाघ्य टिप्पणी करू नये.”