scorecardresearch

“२०१३ अन् २०१८ साली शिवसेनेत लोकशाही पद्धतीने…”, शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

“बाळासाहेब ठाकरेंनी १९९८ साली निवडणूक आयोगाला…”

Eknath Shinde Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

देशात लोकशाही आहे, असं आपण मानतो, तर पक्षांतर्गत सुद्धा लोकशाही आहे. पक्ष फक्त दोनच पातळीवर असतो. एक विधिमंडळ आणि दुसरं संसदीय आणि त्यापलीकडे मोठा पक्ष रस्त्यावर असतो. जो पक्ष आपला नेता, आपली घटना पाळतो, जी घटना शिवसेनेला, त्यानुसार निवडणुका होतात, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं होतं. पण, उद्धव ठाकरेंचं हे विधान दिशाभूल करणार आहे, असा आरोप शिंदे गटाने केला आहे.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी दिल्लीत प्रसारमाध्यांशी संवाद साधला. “उद्धव ठाकरेंनी सहानभुती मिळवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेच्या घटनेसंदर्भात उद्धव ठाकरेंनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. २०१३ आणि २०१८ साली शिवसेनेच्या घटनेत दुरूस्ती करण्यात आली, त्यात शिवसेना प्रमुख पद अबाधित ठेवण्यात आलं. पक्षप्रमुख हे नवीन पद निर्माण केलं.”

हेही वाचा : “त्यांची अडचण ही झालीये की…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला शिंदे गटासमोरचा पेच; पक्षाच्या घटनेचाही केला उल्लेख!

“बाळासाहेब ठाकरेंनी १९९८ साली निवडणूक आयोगाला हमी दिली होती, की पक्षात लोकशाही पद्धत राबवण्यात येईल. पण, २०१३ आणि २०१८ साली झालेल्या पक्षाच्या निवडणुकीत लोकशाही पद्धत राबवण्यात आली नाही. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाबद्दल कोणताही आक्षेप नाही. मात्र, शिवसेना नेते, उपनेते, विभागप्रमुख, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख पदांसाठी कोणतेही मतदान पार पडलं नाही. मुंबईतील गटप्रमुखांनी कधीही मतदान केलं नाही,” असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

हेही वाचा : निवडणूक आयोगाच्या निकालाआधी ठाकरे गटाची मोठी मागणी, उद्धव ठाकरे म्हणाले…

१६ आमदारांच्या अपात्रेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत आयोगाने निर्णय देऊ नये, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. यावर बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, “आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप बाकी आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा असून, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांना हा निर्णय माहिती नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे,” असा टोला राहुल शेवाळेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 16:51 IST