हिंदू आणि मुसलमानांनी आपापसात लढण्यापेक्षा गरिबीशी लढावे, असे पंतप्रधान या नात्याने मोदी म्हणत असले तरी त्यांचा ‘इतिहास’ वेगळेच सांगतो, असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी लगावला. हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडून देशाचे धृवीकरण साधणे हाच मोदी आणि भाजपचा छुपा अजेंडा आहे, अशी टीकाही
त्यांनी केली.
मोदींच्या राज्यातच गोमांस निर्यातीत वाढ!

गोमांस प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा घणाघाती आरोप करीत, मोदी यांच्या राजवटीतच गोमांस निर्यातीत दुपटीने वाढ झाल्याची ट्विपण्णी बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी शुक्रवारी केली.

प्रचारसभेतही त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. गोमांस निर्यातीची आकडेवारी मांडताना ते म्हणाले की, २००३मध्ये गुजरातने १०,६०० टन मांसाची निर्यात केली. २०१३मध्ये हे प्रमाण ३४ हजार ९९० टनांवर गेले. बिहारमध्ये १९५५पासूनच गोमांसबंदी लागू आहे.

त्यामुळे अन्य राज्यांतल्या घटनांचा बिहारमध्ये प्रचारी वापर करणे गैर होते. भाजपला मात्र उमेदवार आणि नेतेच नव्हे तर प्रचाराचे विषयही बिहारमध्ये सापडत नाहीत, असा टोमणाही त्यांनी मारला.