सध्या अटकेत असलेले विजय सिंगला यांच्याकडून जप्त करण्यात आलेली ९० लाख रुपयांची लाच वास्तविक रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्यासाठीच देण्यात आली होती, हे सिद्ध करू शकणारे पुरावे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या हाती आले आहेत. त्यामुळे आता बन्सल यांचीही सीबीआयकडून चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे. या नव्या उलगड्यामुळे बन्सल यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
रेल्वे बोर्डात उच्च पद मिळावे, यासाठी बन्सल यांच्या भाच्यासह सहा जणांबरोबर महेशकुमार यांनी दहा कोटी रुपयांचा सौदा केला होता. सिंगला यांच्यासह ते सहा जणही सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत. बन्सल यांच्यासाठीच सिंगला यांनी महेशकुमारांनी दिलेली लाच स्वीकारल्याचे पुरावे मिळाले आहेत, अशी माहिती सीबीआयमधील सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
लाच म्हणून दिले गेलेले पैसे नेमके कोठून आले होते, याचेही पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. रेल्वेच्या प्रकल्पांशी संबंधित एका कंपनीकडून हे पैसे आले होते आणि एका उद्योगपतीकडून रेल्वेमंत्र्यांच्या भाच्याला ते देत असताना सीबीआयने त्या दोघांना पकडल्यावरून या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचा माग काढला जाऊ शकतो, असे या सूत्राने स्पष्ट केले.
आता या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचे मोबाईल व फोन कॉल्सची माहिती गोळा करण्यात येते आहे. त्यावरून या सर्वांमध्ये व्यवहार होण्याआधी काय चर्चा झाली, त्याची माहिती मिळू शकेल, असेही सूत्राने सांगितले.