येत्या काही दिवसांत रेल्वे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. त्याबाबतच्या प्रस्तावावर विचार सुरू असून, लवकरच निर्णय घेतला जाईल असे रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले.
इंधन अधिभार तरतुदींबाबत अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आला होता. ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी अपेक्षित आहे. त्याबाबतची फाइल आपल्याकडे आली असून, त्याचा अभ्यास करत असल्याचे खरगे यांनी स्पष्ट केले. तोटा कमी करण्यासाठी इंधनदराशी निगडित प्रवासी आणि मालवाहू भाडेवाढ करणार काय, याबाबत वारंवार प्रश्न विचारताच भाडेवाढीची शक्यता नाकारत नाही, असे उत्तर खरगे यांनी दिले. याबाबत काही निष्कर्षांप्रत आल्यावर आम्ही निर्णय घेऊ, असे खरगे यांनी सांगितले.  अर्थसंकल्पातील प्रस्तावांनुसार बाजारपेठेतील परिस्थिती आणि खर्च पाहता रेल्वेने दर सहा महिन्यांनी प्रवासी आणि मालवाहू भाडय़ाचा आढावा घेणार आहे.