Strict Actions Against AC Coach Linen Theft: भारतीय रेल्वे ही देशभरातल्या कोट्यवधी नागरिकांसाठी प्रवासाचं महत्त्वाचं माध्यम आहे. पण यातल्याच काहींनी रेल्वे म्हणजे आयतं सामान मिळण्याचं माध्यम बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार, २०२२ ते २०२६ या चार वर्षांत काही रेल्वे प्रवाशांनी एसी कोचेसमधून तब्बल १ कोटी २७ लाख रुपयांचे टॉवेल, ब्लँकेट्स, उश्या, बेडशिट आणि उश्यांचे कव्हर हातोहात लांबवल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांच्या वर्तनावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून त्यासंदर्भात आता रेल्वे प्रशासनानं थेट प्रवाशांनाच वळण लावण्याचा निर्णय घेतला आहे!
एसी कोचेसमधील लिननच्या वस्तू प्रवाशांपासून वाचवणार!
देशभरातील रेल्वेच्या विभागांमध्ये एसी कोचेसमधील लिननच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये एसी कोचेसमध्ये या वस्तू पुरवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समुपदेशन, CCTV च्या माध्यमातून या वस्तूंवर नजर ठेवणं आणि Coach Mitra APP चा वापर करणं या बाबींचा समावेश आहे. सर्वाधिक भर कंत्राटी कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क बनवण्यासाठी त्यांचं समुपदेशन करण्यावर देण्यात आला आहे.
एसी कोचेसमध्ये प्रवाशांना Bedroll अर्थात ब्लँकेट, उश्या, बेडशिट, टॉवेल अशा गोष्टी पुरवण्याची जबाबदारी कंत्राटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची असते. या वस्तू पुरवताना अधिक सतर्क राहण्यास सांगितले जाणार आहे. यात पुरवल्या जाणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं, प्रवासी उतरल्यानंतर या वस्तू लागलीच गोळा करून घेणं, कामाच्या वेळी या बाबतींत सजग राहाणं, पुरवल्या जाणाऱ्या गोष्टींची योग्य काळजी घेणं अशा गोष्टींबाबत योग्य त्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या जाणार आहेत.
प्रवाशांनी उतरायच्या अर्धा तास आधीच वस्तू कर्मचाऱ्यांना द्याव्यात!
दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसला मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डानं सप्टेंबर २०१५ मध्येच देशभरातल्या सर्व विभागांच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यामध्ये प्रवाशांनी आपल्या नियोजित स्टेशनवर उतरण्याच्या किमान अर्धा तास आधीच बेडशिट, ब्लँकेट, उश्या, टॉवेल अशा वस्तू संबंधित कर्मचाऱ्यांकडे देणं आवश्यक आहे. याशिवाय, ज्या प्रवाशांकडून अशा गोष्टींची चोरी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना योग्य ती समज देणे किंवा प्रसंगी दंड आकारणे या मार्गांचाही अवलंब करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

रेल्वेच्या १६ विभागांमध्ये एकूण १.२७ कोटींच्या वस्तू चोरीला!
आरटीआयअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ ते २०२६ या चार वर्षांत रेल्वेच्या देशभरातील १६ झोनमधल्या एकूण ५४ विभागांमध्ये मिळून तब्बल १ कोटी २७ लाखांच्या वस्तूंची चोरी झाली आहे. त्यात एसी कोचेसमध्ये पुरवले जाणारे लिननचे ब्लँकेट्स, बेडशीट, उश्या, उश्यांचे कव्हर, टॉवेल या गोष्टींचा समावेश आहे. ज्या वस्तू कोचेसमधून हरवतात, त्यांची भरपाई संबंधित कंत्राटदाराच्या बिलातून केली जाते. पुढे कंत्राटदार या रकमेची भरपाई संबंधित कोचमध्ये सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडून करतो.
Coach Mitra APP चा वापर करणार
दरम्यान, अशी चोरी करणाऱ्या प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वेच्या नॉर्थ-वेस्टर्न रेल्वेच्या बिकानेर डिव्हिजनने Coach Mitra APP चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या डिव्हिजनमध्ये सर्वाधिक वस्तूंची चोरी झाल्याचं समोर आलं आहे. “असे चोरीचे प्रकार टाळण्यासाठी आमच्या विभागात कर्मचारी कोच मित्रा अॅपचा वापर करत आहेत. यात त्यांना प्रवाशांच्या चढण्याच्या आणि उतरण्याच्या स्थानकांची माहिती मिळते. याशिवाय, प्रवाशांना या वस्तू कधी दिल्या गेल्या आणि त्यांच्याकडून कधी परत घेतल्या गेल्या, याचीदेखील माहिती यात नोंद करता येते”, असं बिकानेर डिव्हिजनकडून सांगण्यात आलं आहे.
रेल्वेच्या वस्तूंची चोरी अजामीनपात्र गुन्हा!
भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाकडून यासंदर्भात सविस्तर भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. रेल्वे प्रॉपर्टी कायद्यानुसार, रेल्वेची मालमत्ता असणारे टॉवेल, बेडशीट किंवा ब्लँकेट्स चोरणं हा अजामीनपात्र गुन्हा आहे. “जर या वस्तू प्रवाशांनी परत दिल्या नाहीत, तर आरपीएफला अशा संशयित प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, रात्रीच्या रेल्वे गाड्यांमध्ये गस्त घालणं आणि अचानक एसी कोचेसमध्ये जाऊन तपासणी करणं अशाही गोष्टी केल्या जात आहेत”, असं भुसावळ विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
