रेल्वे हॉटेल टेंडरप्रकरणी सीबीआयने माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवींच्या पाटणा येथील घरावर छापे टाकले. लालूप्रसाद यांचे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचीही सीबीआयने सुमारे चार तास चौकशी केली.

यापूर्वी याच प्रकरणात सीबीआयने लालू यांची मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात चौकशी केली होती. तेजस्वी यादव यांच्यावर जुलै महिन्यात याप्रकरणी गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. आयआरसीटीसीच्या हॉटेलच्या लिलावातील घोटाळ्याशी निगडीत हे प्रकरण आहे. याप्रकरणी लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अनेक ठिकाणांवर यापूर्वीही छापेमारी झालेली आहे.

संवैधानिक पदावर असताना जवळच्या लोकांना फायदा मिळवून दिल्याचा लालूंवर आरोप आहे. रेल्वे मंत्री असताना लालूंनी बीएनआर रांची आणि बीएनआर पुरीच्या देखभालीची जबाबदारी एका खासगी हॉटेलकडे सोपवली होती. लालूंनी याबदल्यात एक बेनामी कंपनीच्या माध्यमातून तीन एकर जमीन कमिशन स्वरूपात स्वीकारली होती. त्या हॉटेलचे नाव सुजाता हॉटेल असे होते. तर त्याची मालकी ही विनय आणि विजय कोचर यांच्याकडे होती.