शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; रेल्वेनं IRCTC संदर्भातला तो निर्णय घेतला मागे

रेल्वे मंत्रालयानं आयआरसीटीसीच्या (IRCTC) सुविधा शुल्काबाबत (convenience fee) घेतलेला निर्णय मागे घेतलाय.

रेल्वे मंत्रालयानं आयआरसीटीसीच्या (IRCTC) सुविधा शुल्काबाबत (convenience fee) घेतलेला निर्णय मागे घेतलाय. आधीच्या निर्णयानुसार सुविधा शुल्कातील महसूल १ नोव्हेंबरपासून ५०-५० टक्के वाटप करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने दिले होते. मात्र, यानंतर आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली. यानंतर आता रेल्वे मंत्रालयाने अखेर हा निर्णय मागे घेतलाय. यामुळे आता शेअर्स गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. सार्वजनिक संपत्ती आणि गुंतवणूक विभागाच्या सचिवांनी रेल्वे मंत्रालयानं आपला निर्णय मागे घेतल्याचं ट्वीट करत माहिती दिली.

रेल्वे मंत्रालयाने याआधी सुविधा शुल्कातील महसुलापैकी ५० टक्के वाटा आयआरसीटीसीने रेल्वे विभागाला द्यावा असे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून करण्याचंही सांगण्यात आलं होतं. मात्र, रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयानंतर आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली. यानंतर तात्काळ रेल्वे मंत्रालयाने सुविधा शुल्कातील विभागणीचा निर्णय मागे घेतला. यानंतर आता आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालीय.

हेही वाचा : IRCTC च्या शेअरचा भाव उच्चांकाहून तब्बल ५० टक्क्यांनी गडगडला; गुतंवणूकदारांनी काय करावं? विकावा की विकत घ्यावा?

रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानंतर शेअर बाजारात नेमकं काय घडलं?

आयआरसीटीसीच्या शेअरची किंमत ४६ टक्क्यांनी घसरून २० ऑक्टोबरला बीएसईवर उच्चांकी किमतींवरून ४,३७१ रुपयांवर पोहोचला. मंगळवारी (१९ ऑक्टोबर) आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) च्या स्टॉकमध्ये ट्रेडिंगच्या सुरुवातीला जोरदार उसळी घेतली होती आणि ती ६,३९६.३० रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. तसेच, कंपनीचे मार्केट कॅप १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते.

भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल आज इंट-डे ट्रेडमध्ये ६९,९३६ कोटी रुपयांवर आले आहे. मंगळवारी इंट्रा-डे व्यापारात ते १.०२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. मंगळवारी आयआरटीसीचे शेअर ६,३९३ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते.

दोन वर्षांत १९च्या पटीने परतावा

२०१९ मध्ये, जेव्हा आयआरसीटीसी आयपीओ आला, तेव्हा इश्यू किंमत ३१५-३२० रुपये प्रति शेअर होती. मंगळवारी IRCTC च्या शेअरची किंमत ६,३९६.३० रुपयांवर पोहोचली होती. म्हणजेच, या स्टॉकने दोन वर्षात जवळजवळ १९ पट परतावा दिला आहे. आयआरसीटीसी चा ६३८ कोटी रुपयांचा आयपोओ ३० सप्टेंबर २०१९ रोजी आला आणि तीन ऑक्टोबर २०१९ ला बंद झाला. आयपीओ ११२ वेळा सबस्क्राइब झाला. या नंतर IRCTC ने १४ ऑक्टोबर २०१९ रोजी शेअर बाजारात प्रवेश केला आणि शेअर ६४४ रुपयांच्या किंमतीवर सूचीबद्ध केला गेला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Railway ministry withdraws decision on irctc convenience fee revenue pbs

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना