सोशल मीडियावर सध्या एका रेल्वेमधील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रवासी वातानुकूलित (AC) डब्याच्या ‘अप्पर बर्थ’वर बसून थेट पेटत्या दिव्यानं आणि अगरबत्तीनं पूजा करताना दिसत आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भारतीय रेल्वेनं या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रवाशांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण…

साधारण एक मिनिटाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एक प्रवासी AC डब्यात वरच्या बर्थवर बसून निरंजन (तेलाचा दिवा) आणि अगरबत्ती लावून पूजा करताना स्पष्ट दिसत आहे. डब्यातील इतर प्रवाशांनी त्याला तातडीने थांबवण्याचा प्रयत्न केला आणि “यामुळे सर्वांचा जीव धोक्यात येऊ शकतो,” अशी स्पष्ट चेतावणीही दिली. मात्र, बंदिस्त आणि वातानुकूलित डब्यात आगीचा मोठा धोका असतानाही सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून हा प्रकार घडला.

रेल्वे प्रशासनाकडून आरोपी प्रवाशाचा शोध सुरू

रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सर्वांत आधी कोणत्या सोशल मीडिया अकाउंटवरून अपलोड करण्यात आला होता, याचा तांत्रिक तपास सुरू आहे. संबंधित अकाउंट ट्रेस होताच ट्रेन क्रमांक आणि व्हिडिओमधील प्रवाशाची ओळख पटवून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

नियम मोडल्यास १० हजार रुपयांचा दंड आणि तुरुंगवास

ट्रेनमधील प्रवाशांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ज्वलनशील आणि धोकादायक वस्तू वाहून नेण्याबाबतचे नियम अत्यंत कठोर केले आहेत. ‘जन विश्वास (तरतुदी दुरुस्ती) कायदा २०२६’ (Jan Vishwas Act, 2026) अंतर्गत रेल्वे कायद्यातील कलम ६७, १५४, १६४ आणि १६५ नुसार ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थ आणणे हा गंभीर आणि दंडनीय अपराध आहे.

नव्या नियमांनुसार:

  • किमान दंड: ट्रेनमध्ये बंदी घातलेल्या किंवा धोकेदायक वस्तू आणल्यास किमान १०,००० रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
  • तुरुंगवास: दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्यास किंवा गंभीर उल्लंघन आढळल्यास १ वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा दंड आणि कैद या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
  • नुकसानभरपाई: या निष्काळजीपणामुळे रेल्वेच्या मालमत्तेचे काही नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण भरपाई संबंधित प्रवाशाकडूनच वसूल केली जाईल.

ट्रेनमध्ये ‘या’ वस्तू घेऊन जाण्यास सक्त मनाई

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ट्रेनमध्ये आगीच्या दुर्घटना घडण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन करून डब्यात ज्वलनशील वस्तू आणणे हेच असते.

ट्रेनमध्ये प्रतिबंधित असणाऱ्या प्रमुख वस्तू:

  • पेटती शेगडी किंवा लहान-मोठे गॅस सिलेंडर
  • रॉकेल (केरोसीन), पेट्रोल, डिझेल किंवा इतर ज्वलनशील द्रव
  • फटाके आणि स्फोटक साहित्य
  • काडेपेटी आणि सिगारेट/बीडी
  • कागदाचे मोठे गठ्ठे किंवा ज्वलनशील पोस्टर्स

रेल्वे प्रवासादरम्यान असा कोणताही धोकादायक प्रकार घडताना दिसल्यास प्रवाशांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी (RPF) किंवा १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.