Railway Special Trains NEET Retest schedule : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा रविवारी २१ रोजी होत आहे. या पुनर्रचन परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य प्रदेशात विशेष ट्रेन चालवणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. अधिकृत घोषणेनुसार, इंदूर-भोपाळ विशेष ट्रेन शनिवारी सकाळी ११:२५ वाजता इंदूरहून सुटणार असून संध्याकाळी ७ वाजता वाजता भोपाळला पोहोचणार आहे. या प्रवासात ती फतेहाबाद, बडनगर, रतलाम, नागदा, उज्जैन, मक्सी, शुजालपूर, सिहोर आणि संत हिरदाराम नगर येथे थांबेल. परंतु, हीच ट्रेन त्याच दिवशी संध्याकाळी ७.४० वाजता भोपाळहून सुटेल आणि सुमारे पाच तासांनंतर रतलामला पोहोचेल. म्हणजेच, रविवारी दुपारी २ ते ५:१५ या वेळेत होणाऱ्या नीट परीक्षेला उमेदवार बसण्यापूर्वीच ही परतीची ट्रेन निघून गेलेली असेल. या ट्रेनमुळे काही उमेदवारांना परीक्षेच्या एक दिवस आधी भोपाळला पोहोचण्यास मदत होऊ शकते, परंतु परीक्षा संपल्यानंतर त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी कोणतीही संबंधित विशेष व्यवस्था करण्यात आलेली दिसत नाही. NDTV ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

तिकिटाचे भाडेही अधिक

वरिष्ठ अधिकारी सौरभ कटारिया यांनी सांगितलं की, प्रवाशांची, विशेषतः नीटचे उमेदवार आणि त्यांच्या पालकांची अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही विशेष ट्रेन चालवली जात आहे. मात्र, परतीच्या ट्रेनच्या वेळेमुळे ही व्यवस्था खरोखरच विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन केली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. नीटचे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे या ट्रेनचे भाडे होय. इंदूर-भोपाळ विशेष ट्रेनसाठी स्लीपर क्लासचे भाडे ३५० रुपये आहे. याच मार्गावरील नियमित गाड्यांचे भाडे यापेक्षा खूपच कमी आहे. जोधपूर-भोपाळ एक्सप्रेस स्लीपर क्लाससाठी सुमारे १५० रुपये, तर माळवा एक्सप्रेस सुमारे १८० रुपये आकारते. त्यामुळे या विशेष ट्रेनने उज्जैन ते भोपाळ प्रवास करणाऱ्या उमेदवाराला नियमित स्लीपर भाड्याच्या दुप्पट रक्कम मोजावी लागू शकते.

इतकेच नाही तर बडनगर, रतलाम, नागदा, उज्जैन, मक्सी किंवा सिहोर यांसारख्या मध्यवर्ती स्थानकांवरून चढणाऱ्या उमेदवारांनाही इंदूर-भोपाळचे पूर्ण ३५० रुपये स्लीपर भाडे द्यावे लागेल. भोपाळ ते रतलाम या परतीच्या प्रवासासाठी किमान स्लीपर भाडे २९५ रुपये आहे. नीमच, मंदसौर, जावरा, पिपलिया मंडी आणि मल्हारगड ही शहरेही मध्य प्रदेशातच आहेत, तरीही या ठिकाणच्या उमेदवारांना भोपाळसारख्या परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी कोणतीही थेट विशेष ट्रेनची सोय दिसत नाही. या भागातील अनेक उमेदवारांना कनेक्टिंग ट्रेन, बस किंवा खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागेल.

जेव्हा एनडीटीव्हीने रेल्वेला या व्यवस्थेबद्दल विचारले, तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितले की रतलाम विभागाने डब्यांच्या उपलब्धतेनुसार या गाड्या चालवल्या आहेत.इंदूर आणि रतलाम रेल्वे स्थानकांवर एनडीटीव्हीने प्रवासाची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची आणि पालकांची भेट घेतली. परीक्षेच्या दडपणाखाली असल्याने बहुतेक जण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास कसरत करत होते. त्यांच्यासाठी ही पुनर्परीक्षा म्हणजे त्यांच्या नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीमुळे लादलेली दुसरी संधी आहे. त्यातच आता या प्रवासाच्या नियोजनाने त्यांच्या चिंतेत आणखी एक भर घातली आहे.