भारतीय रेल्वेकडून विविध सेवा दिल्या जातात, त्यावरील ३०० कोटींचा सेवाकर अदा केलेला नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे रेल्वे खातेच आता महसूल अधिकाऱ्यांच्या नजरेखाली आहे. सोळा विभागात नेमक्या कुठल्या सेवा दिल्या. तत्काल, तिकीट रद्द करणे, गाद्यांचे शुल्क या सेवांतून किती पैसा मिळाला अशी विचारणा रेल्वेला करण्यात आली आहे. केंद्राच्या महसूल अधिकाऱ्यांनी रेल्वेने अदा केलेल्या सेवाकराची माहिती मागवली होती त्यात असे दिसून आले की, रेल्वेच्या काही विभागांनी तत्काल सेवा, तिकटी रद्द करणे, गाद्याच्या उपलब्धतेची सेवा यावर कर भरलेला नाही, असे दिसून आले आहेत. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असून त्याचा सविस्तर तपशील अजून हाती आलेला नाही. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही जो सेवाकर लावला तो अर्थ खात्याच्या प्रस्तावानुसार लावला आहे. सेवाकराच्या इतर प्रश्नात रेल्वे प्रशासन व सेवाकर अधिकारी यांच्यात चर्चा सुरू आहे. सरकारचे निकष पाळण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेने वर उल्लेख केलेल्या काही सेवांतून मिळालेला कर जमा केलेला नाही. सेवाकराची रक्कम कमी भरली गेली आहे, या प्रकरणी चौकशी सुरू असून रेल्वेने ३०० कोटींचा सेवाकर चुकवला असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले आहे.